31 जानेवारीला मुंबईत मराठ्यांचं वादळ धडकणार
By admin | Published: January 5, 2017 08:35 PM2017-01-05T20:35:08+5:302017-01-05T20:35:08+5:30
मुंबईत 31 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - कोपर्डीतील बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध जिल्ह्यांत मराठा क्रांती मोर्चा यशस्वी झाला असतानाच आता मुंबईत मराठ्यांचं वादळ धडकणार आहे.
मुंबईत 31 जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदानापर्यंत निघणार आहे. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता मरिन ड्राइव्हहून मोर्चाला सुरुवात होणार असून, तो थेट आझाद मैदानात जाऊन थांबणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह थेट राज्यपालांनाही निवेदन देण्यात आलं आहे. मराठा समाजाला अद्यापही आरक्षण न दिल्याबद्दल सरकारच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली आहे.
(VIDEO- मराठा मोर्चासाठी मुंबईत बाइक रॅलीचं आयोजन)
कोपर्डी बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर राज्यभरात हे मोर्चे सातत्यानं काढण्यात आले आहेत. या मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील लोकांनीही सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीनं शांततेत काढण्यात आले आहेत. मोर्चासाठी विदर्भासह मराठवाड्यातून हजारो मोर्चेकरी सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा तरुणींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरक्षण देण्यासंदर्भात निवेदनही दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.