मराठवाड्यात आठ महिन्यांत 580 शेतकरी आत्महत्या, परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 04:44 PM2017-08-16T16:44:08+5:302017-08-16T17:35:15+5:30
मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे.
औरंगाबाद, दि. 16 : सरकारच्या कर्जमाफीनंतंर शेतक-यांचे प्रश्न आता तरी सुटतील अशी अपेक्षा होती. पण मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी तीन - चार शेतकरी आपली जिवनयात्रा संपवतात.
दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येकवर्षी पडणाऱ्या अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे शेती तोट्यात जात आहे. मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या घडल्याचं समोर आलं आहे. एकट्या बीडमध्येच 107 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्या लोकांच्यामते सरकारनं शेती समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. मराठवाड्या सारख्या भागात कमी पाऊस पडतो हे जगजाहीर असताना सरकरनं केलेल्या उपायोजनाचा कोणताच फायदा का होत नाही. सरकारनं जलयुक्त शिवारसारख्या योजना यशस्वी केल्याचा दावा केला आहे. तर मग आत्महत्या का थांबायला तयार नाहीत. असा प्रश्न सर्वसामान्या जनतेतून विचारला जात आहे.
गेल्या तीन ते चार वर्षापासून मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतक-यांवर मोठे संकट होते. याकाळात बँका, सावकाराकडून घेतलेल्या कर्जात मोठी भर पडत गेली. राज्य सरकारने शेतक-यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने अनेक शेतकठयांना मोठा दिलासा मिळाला. परंतू पावसाच्या अवकृपेने हजारो हेक्टर जमिनीवर घेतलेल्या पिकांचे पाण्याअभावी योग्य वाढ होत नसल्याने अपेक्षित उत्पन मिळणार नाही. असा प्रश्न सतत शेतक-यांना भेडसावत आहे. मराठवाड्यात सतत पडणा-या दुष्काळाने शेतकरी आत्महत्या प्रमाण प्रत्येक वर्षी वाढतच असून सरकारने केलेले प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसत आहे. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत मराठवडा महसूल विभागात प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार 531 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती होती. तोच आकडा ऑगस्ट महिन्याच्या 13 तारखे पर्यंत तब्बल 580 पर्यंत पोहचला तर 6 ते 13 ऑगस्ट या सात दिवसाच्या काळात 34 शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या तेरा दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात 5, बीड जिल्ह्यात 12, नांदेड 9, परभणी 7, जालना 6, लातूर 5, उस्मानाबाद 4 तर हिंगोलीत एका शेतक-याने आत्महत्या केल्याची नोंद घेण्यात आली आहे.
तीन वर्षापूर्वी तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतक-यांना उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने येथील कृषीक्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसत आहे. यावर्षी पावसाळ्याचे दोन सव्वा दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळी ढग दाटून आले आहेत. त्यामुळे निराशेतून शेतकरी आत्महत्या करण्याचा टोकाचा मार्ग पत्करतो आहे.
आणखी वाचा : कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या अन् आंदोलने
मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्येची प्रकरणे