मराठवाड्यातील दुष्काळाची ‘युनिसेफ’कडून पाहणी
By admin | Published: June 12, 2016 03:54 AM2016-06-12T03:54:17+5:302016-06-12T03:54:17+5:30
ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.
लातूर : ग्रामीण भागातील लोकांवर दुष्काळाचा कसा परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी ‘युनिसेफ’च्या पथकाने शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावात सर्वेक्षण केले.
देशातील १७ राज्यांत दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भविष्यात कशा पद्धतीने नियोजन करावे़ तसेच तीन वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळाची प्रमुख कारणे काय?, याचा शोध आणि अभ्यास करण्यासाठी युनिसेफ व रेडआर या दोन संस्थांचे नऊ सदस्यांचे पथक बीड व लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ७ ते १० जून या कालावधीत लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात वांजरवाडा व उमरदरा, अहमदपूर तालुक्यातील काही गावांची पथकाने पाहणी केली. शुक्रवारी औसा तालुक्यातील टाका व मासुर्डी गावांची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली़ पाणी साठविण्याच्या टाक्यांचेही त्यांनी निरीक्षण केले.
पथकप्रमुख युसुफ कबीर, युधिष्ठीर पाणीग्रही, भारती ताहिल्यानी, वल्लरी अग्रवाल, मिनाक्षी झा, डॉ़ मंगेश गढरी, डॉ़ पुष्कर देशमुख, भाऊसाहेब पवार, डॉ़ समीर पेठे, शुभांगी गुरवे यांचा समावेश होता. मंगळवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला़ त्यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची चार वर्षांची माहिती संकलित केली. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याशीही युसुफ कबीर यांनी चर्चा केली़ (प्रतिनिधी)
अहवाल बनविणार
लातूर व बीड जिल्ह्यात केलेल्या पाहणीचा अहवाल तयार होणार आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे पथकातील सदस्य समीर पेठे यांनी सांगितले.