मराठवाड्याला अखेर वरुणराजा पावला !

By admin | Published: August 5, 2015 01:18 AM2015-08-05T01:18:50+5:302015-08-05T01:18:50+5:30

कृत्रिम पावसाचे तळ्यात-मळ्यात सुरू असताना मराठवाड्यावर मंगळवारी निसर्गराजाचीच कृपा झाली. उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यात रिमझिम

Marathwada finally got Varunaraja! | मराठवाड्याला अखेर वरुणराजा पावला !

मराठवाड्याला अखेर वरुणराजा पावला !

Next

औरंगाबाद/नागपूर : कृत्रिम पावसाचे तळ्यात-मळ्यात सुरू असताना मराठवाड्यावर मंगळवारी निसर्गराजाचीच कृपा झाली. उस्मानाबाद वगळता सातही जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. अनेक ठिकाणी भरपावसात रांगा लावून मतदारांनी त्यांचा हक्क बजावला.
पैठण तालुक्यातील बिडकीन भागात काहीवेळ जोरदार सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने घेतलेल्या नोंदीनुसार ४.६ मि.मी. पाऊस झाला होता. नांदेड, जालना, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता.
खान्देशात दमदार
खान्देशातील जळगाव व धुळे जिल्ह्यात ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी पावसाचे दमदार आगमन झाले. नंदुरबार जिल्ह्यातही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रिपरिप झाली.

पुढील २४ तासांत मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला.
विदर्भात संततधार
दीर्घ उघडीप दिल्यानंतर सोमवारपासून विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर सर्वदूर संततधार सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
अमरावती जिल्ह्यात २८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. दर्यापूर तालुक्यात शहानूर नदीच्या पुरामध्ये मनोहर श्रीराम काळे (५५) हे वाहून गेले. पावसाच्या संततधारेमुळे कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारा (३२ मिमी), चंद्रपूर (१७.२ मिमी), यवतमाळ (२७ मिमी), वर्धा (२९६.५० मिमी), गोंदिया (३४४.०३ मिमी) व गडचिरोलीत (२८.२ मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Marathwada finally got Varunaraja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.