मराठवाड्यात पूरस्थिती
By admin | Published: October 2, 2016 02:55 AM2016-10-02T02:55:56+5:302016-10-02T02:55:56+5:30
मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शनिवारी लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती ओढविली. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शनिवारी लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती ओढविली. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ३० गावकरी पुरात अडकल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटले. बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही परतीच्या पावसाने तडाखा दिला.
अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव येथे २३ गावकरी शनिवारी सकाळी सात वाजेपासून पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका केल्याचे समजते. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात सावरगाव थोट येथे एक मुलगा पुरात वाहून गेला. मावलगावचे १० तर कामखेड्यातील २१ शेतकरी पुरात अडकले होते. त्यातील काहींची संध्याकाळी सुटका करण्यात आली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने सायंकाळी हेलिकॉप्टर मागविले होते. दोन्ही जिल्ह्यांत रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. उदगीरमध्ये तिरु नदीला मोठा पूर आल्याने जवळपास १५० घरांमध्ये पाणी शिरले. पानगावातील रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्यामुळे शनिवारी सकाळी नांदेड-बंगळरू एक्स्प्रेस दोन तास पानगाव रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती. मांजरा आणि तावरजाकाठच्या ५८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उस्मानाबादचा तेरणा मध्यम प्रकल्प तुडूंब भरला़ जिल्ह्यातील ११५ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर जवळच्या वाघदरवाडी येथील ३० वर्षे जूना लघु सिंचन तलाव शनिवारी सकाळी फुटला. माजलगाव येथील मोठ्या धरणाचे ११ पैकी पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडलेले आहेत. परभणी जिल्ह्यात मासोळी नदीच्या पुराचे पाणी पिंपळदरीसह दोन गावांत घुसले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्य सरकार मराठवाड्यातील विशेषत: लातूर व नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीवर विशेष लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाकडून लोकांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
मी स्वत: मदतीचा आढावा घेतला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात रेणापूरमध्ये १२, अहमदपूरमध्ये १० तर नांदेड जिल्ह्यात डोंगरगाव येथे ८ गावकरी पुरात अडकले आहेत. जळकोट तालुक्यात दोघांची सुटका करण्यात आली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर...
लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर
दोन्ही जिल्ह्यांत ‘एनडीआरएफ’ला पाचारण
बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनाही तडाखा
लातूर-नांदेड-सोलापूरची वाहतूक बंद
जळगावमध्ये पाऊस
जळगाव जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. वरणगाव (ता. भुसावळ) येथील रामपेठ व अयोध्यानगर भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.
धुळ््यात चौघांचा बुडून मृत्यू
धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये शनिवारी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. साक्री तालुक्यातील मालपूर येथे दोन महिलांचा विहिरीत तर सोनगीर येथे पाण्याच्या डबक्यात दोन शाळकरी मुलांना बुडून मृत्यू झाला.
उजनी भरले!
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे धरणाच्या पाण्याची पातळी १०० टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात ११६.९८ टीएमसी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा ५३.२२ टीएमसी आहे. गतवर्षी १ आॅक्टोबरला हा साठा ३.९९ टीएमसी पाणी होता.