‘जलयुक्त’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी मराठवाड्याला सर्वाधिक निधी
By admin | Published: November 7, 2016 06:08 AM2016-11-07T06:08:10+5:302016-11-07T06:08:10+5:30
राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली
परभणी : राज्यातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवारची योजना राबविण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात राज्यभरातील दुष्काळी भागांत जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाली. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाने विभागवार निधी संमत केला असून त्यातील सर्वात मोठा वाटा औरंगाबाद विभाग अर्थात मराठवाड्याला मिळाला आहे. शुक्रवारी निधी वाटपासंदर्भातील शासन निर्णय जलसंधारण विभागाच्या अव्वर सचिवांनी काढले.
औरंगाबाद विभागातील १ हजार ५१८ गावांसाठी तब्बल १० कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर पुणे विभागाला ६ कोटी ११ लाख, कोकण विभागाला १ कोटी २ लाख, नाशिक विभागाला ६ कोटी १८ लाख, नागपूर विभागाला ५ कोटी १४ लाख आणि अमरावती विभागाला ६ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी मराठवाड्याला सर्वाधिक, तर सर्वाधिक पाऊस होणाऱ्या कोकण पट्ट्याला सर्वात कमी निधी संमत करण्यात आला आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून महात्मा जोतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानास उपलब्ध झालेला निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०११-१२ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अभियानाला निधी देण्यास सुरुवात झाली. २०१६-१७ मध्ये याच योजनेतून ४० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान जलयुक्त शिवार अभियानासाठी वितरित केले जात आहे. त्यात ५ कोटी रुपयांचा निधी राज्यस्तरावरील प्रसिद्धीसाठी राखून ठेवला असून उर्वरित ३५ कोटी रुपयांचा निधी निवडलेल्या गावांसाठी संमत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)