पिण्याच्या पाण्यासाठी ‘मराठवाडा ग्रीड’ योजना
By admin | Published: June 8, 2016 03:32 AM2016-06-08T03:32:45+5:302016-06-08T03:32:45+5:30
गुजरातच्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली
मुंबई : मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. येत्या १५ दिवसांत या योजनेला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे पाणीपुरवठा
मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
गुजरातच्या कच्छ भागात भीषण दुष्काळी स्थिती होती. त्यावर ग्रीडच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले. त्याच धर्तीवर मराठवाड्यात योजना राबविली जाणार आहे. लोणीकर यांनी अलीकडे कच्छचा दौरा करून या योजनेची माहिती घेतली. या योजनेंतर्गत मराठवाड्यातील
नद्या, खोरे, विविध सिंचन प्रकल्प यांचा अभ्यास केला जाईल. उजनी, जायकवाडी, येलदरी, लोअर दुधना, विष्णुपुरी आदी प्रकल्पांच्या जलस्रोतांचा अभ्यास करून इतरत्र उपलब्ध असलेले पाणी एकमेकांना जोडून मराठवाड्यात ते पुरविले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली.
(विशेष प्रतिनिधी)
सोयाबीन उत्पादकांना
पीक विम्याचा लाभ
मराठवाड्यातील काही तालुक्यांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले. हा लाभ दिला जात नसल्याची तक्रार पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ बैठकीतच केली.