मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन: मनसे 'रझाकार' आणि 'सजा'कारांचाही बंदोबस्त करेल; खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 02:05 PM2022-09-17T14:05:30+5:302022-09-17T14:07:06+5:30

Marathwada Mukti Sangram Din : "हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!"

Marathwada Mukti Sangram Day MNS will arrange Razakar and Sajakar too; Raj Thackeray gave good wishes in writing a letter | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन: मनसे 'रझाकार' आणि 'सजा'कारांचाही बंदोबस्त करेल; खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन: मनसे 'रझाकार' आणि 'सजा'कारांचाही बंदोबस्त करेल; खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

googlenewsNext

आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन. यालाच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनही (Marathwada Mukti Sangram Din) म्हटले जाते. कारण तेव्हा मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानचाच एक भाग होता. संपूर्ण देश इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाला होता. मात्र हैदराबाद संस्थान आणि पर्यायाने मराठवाडा हा पारतंत्र्याच्याच अंधःकारात खितपत पडलेला होता. येथे निजामाचे राज्य होते. 1948 मध्ये सरदार पटेलांच्या नेतृत्वात निजाम संस्थानवर ऑपरेशन पोलो नावाने कारवाई करण्यात आली आणि आजच्याच दिवशी हैदराबाद मुक्त झाला, स्वतंत्र झाला. याचीच आठवण म्हणून दर 17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन अथवा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. आज या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहित, हा दिवस सणासारखा साजरा व्हायला हवा, असे म्हणत मराठवाड्यातील जनतेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आजचा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला हवा - 
आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले, "आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे. 

राज म्हणाले, मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही.

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा कदापी विसरता कामा नये -
पुढे राज यांनी म्हटले आहे, की "माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये." 

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाही, 'सजा'कारही येऊन बसलेत - 
"मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल ? अर्थात 'रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे. बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक 'सजा'कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्षं संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून, लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार. अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजा कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच, असा इशाराही राज यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. 

याच बरोबर, "आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा आणि माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे, की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे," असेही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Marathwada Mukti Sangram Day MNS will arrange Razakar and Sajakar too; Raj Thackeray gave good wishes in writing a letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.