गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 10:18 AM2023-09-17T10:18:05+5:302023-09-17T10:18:43+5:30
marathwada mukti sangram din : राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शाब्दिक टोलेबाजी करत राज यांनी अन्याय करणाऱ्यांना चिमटे काढले आहेत. "आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता", असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पण हे करताना फक्त 'फोटो-ऑप' म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.
आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2023
पण हे करताना फक्त 'फोटो-ऑप' म्हणून…
शाब्दिक टोलेबाजी
तसेच तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे. मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या 'सजा'कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा, असेही राज यांनी नमूद केले.