अवघ्या ७ टीएमसीवर मराठवाड्याची बोळवण
By Admin | Published: October 13, 2016 06:29 AM2016-10-13T06:29:15+5:302016-10-13T06:29:24+5:30
कृष्णा मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली
अतुल कुलकर्णी /मुंबई
कृष्णा मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण आता २१ टीएमसीऐवजी ७ टीएमसी पाण्यावर मराठवाड्याची बोळवण केली जाणार असून, तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पाठवले आहे.
मराठवाड्यातला २१ टीएमसी पाणी देण्याला राष्ट्रवादीचा सुरुवातीपासून विरोध आहे. या विरोधातूनच आघाडी सरकारच्या काळात हा वाद कृष्णा पाणी तंटा लवादाकडे गेला. लवादाने कृष्णेतून भीमात, अर्थात आंतरउपखोऱ्यातून १४ टीएमसी पाणी सोडण्यास मनाई केली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आंतरउपखोरे पाणी देण्याला लवादाचा विरोध असल्याने त्याला न्यायालयात आव्हान देणे, त्यासाठी कायदेशीर लढाई करणे यासाठी मराठवाड्यात कोणतेही आंदोलन उभे राहिलेले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून फक्त ७ टीएमसी पाण्यासाठीच्या खर्चाचे तपशील समोर आले आहेत. उजनीचे पाणी मराठवाड्याला द्यायचे झाल्यास, नीरा नदीचे ७ टीएमसी पाणी भीमा नदीत टाकून ते मराठवाड्याला द्यावे लागणार आहे. या योजनेचा सुधारित खर्च ५,५९९ कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ४,८१७ कोटी रुपये खर्च करणे अजून शिल्लक आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ या पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प कालबद्धरीत्या राबविण्याचे सरकारने ठरवले असून, त्यानुसार हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात दरवर्षी १२०० कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. आज दरवर्षी फक्त १०० ते १५० कोटी रुपये या प्रकल्पावर दिले जात आहेत. जर १२०० कोटी रुपये द्यायचे असतील तर हा प्रकल्प राज्यपालांच्या निर्देशातून वगळावा लागेल. तशी परवानगी द्या, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.