मराठवाड्यात संप सुरूच!
By Admin | Published: June 5, 2017 04:54 AM2017-06-05T04:54:42+5:302017-06-05T04:54:42+5:30
लातूर वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशी शेतकरी संप सुरूच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लातूर वगळता मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशी शेतकरी संप सुरूच होता. अनेक ठिकाणी आठवडी बाजार न झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात एका दूध विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबादला आठवडी बाजार बंद
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे आठवडी बाजार रविवारी बंद होते. त्यामुळे जवळपास ३ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. सिल्लोड, पाचोड व लासूर स्टेशन येथेही रविवारी गुरांचा मोठा बाजार भरतो. रविवारी सर्व ठप्प होते.
मागणीसाठी राजूर (जि. जालना) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी आठवडे बाजार बंद ठेवून राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन कले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकांनी दूध रस्त्यावर फेकून सरकारविरोधी घोषणा दिल्या. टेंभुर्णी बाजारात विक्रीस आलेला भाजीपाला शेतकऱ्यांनी विकू दिला नाही.
परभणीत रास्ता रोको
चौथ्या दिवशी झरी, पेडगाव (ता. परभणी) आणि ताडकळस (ता. पूर्णा) येथील आठवडी बाजार बंद होते. पिंगळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणगावला किसान क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भाजीपाल्याची वाहने अडवून ती परत पाठविली.
नांदेडला १५ शेतकऱ्यांना अटक
अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यातील मालेगाव रस्त्यावर डौर व देगाव कु. येथे रविवारी सकाळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी १५ शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदवून अटक केली आहे.
बीड जिल्ह्यातही परिणाम
बीड जिल्ह्यात आठ आठवडी बाजार बंद होते. तालखेडमध्ये सोमवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धारूरमध्ये सोमवारी बाजार भरणार नाही.
हिंगोलीत शिवसेना रस्त्यावर
हिंगोली जिल्ह्यात ताकतोडा, जवळा बाजारला आठवडी बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला. आंदोलनात शिवसेनेनेही उडी घेतली असून सोमवारपासून आंदोलन अधिक तीव्र होणार आहे.
दूध विक्रेत्यास मारहाण
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील अमृतवाडी येथील दीपक अनिरुद्ध गंदुरे (२२) या दूध विक्रेत्यास अपसिंगा चौकात चौघांनी मारहाण करून १५० लीटर दूध ओतून दिले़ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.