मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या विळख्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 04:45 AM2019-08-27T04:45:40+5:302019-08-27T04:45:58+5:30
वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला.
औरंगाबाद : आॅगस्ट महिना संपत आला तरीही मराठवाड्यावरील दुष्काळाचे मळभ कायम आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात १० टक्क्यांनी पेरा कमी झाला आहे. ४३ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजून जोत्याच्यावर पाणी आलेले नाही. १०३७ गावे व १७१ वाड्या १३२३ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला. विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ५०९.४६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते ३१६.६७ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १९२ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे.
विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.५० टक्क्यांच्या आसपास, ११ मोठ्या प्रकल्पांत ०.६२ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत दीड टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण भरले आहे, एवढीच समाधानाची बाब आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ
१ जानेवारी ते २५ आॅगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात विभागात ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८१, जालन्यात ६५, परभणी जिल्ह्यात ५०, हिंगोलीत २४, नांदेड ७४, बीड १३१, लातूर ५८, उस्मानाबाद जिल्ह्यात ८१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.