मराठवाड्यातील दोन वजीर आमने-सामने!

By admin | Published: March 3, 2015 02:27 AM2015-03-03T02:27:09+5:302015-03-03T02:27:09+5:30

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज मराठवाड्यातील दोन वजीर एकमेकांना शह देण्यासाठी समोरासमोर उभे आहेत.

Marathwada two wagers face-to-face! | मराठवाड्यातील दोन वजीर आमने-सामने!

मराठवाड्यातील दोन वजीर आमने-सामने!

Next

सुधीर महाजन - औरंगाबाद
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज मराठवाड्यातील दोन वजीर एकमेकांना शह देण्यासाठी समोरासमोर उभे आहेत. एकाला उधळलेला डाव पुन्हा मांडायचा, तर दुसरा सत्तेच्या जोरावर त्याचे मनसुबे उधळण्यासाठी तयारीत आहे. अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीने राज्यात चव्हाण-दानवे शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे.
अशोक चव्हाणांची नियुक्ती ही पक्षापुढील आव्हान पेलण्यासाठी सक्षम नेता या निकषातून झाली. कारण उद्योगमंत्री, महसूलमंत्री, मुख्यमंत्री अशी यशस्वी कारकीर्द त्यांच्या खात्यावर जमा आहे. त्याच वेळी केंद्रातील मंत्रीपद सोडून दानवे राज्यात आले. चव्हाणांना पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान आहे; पण त्याच वेळी दानवे यांना पक्ष वाढविण्याची जबाबदारी, भाजपाच्या दारात मुंडावळ्या बांधून उभ्या असलेल्यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचे काम.
या दोघांना येत्या काही दिवसांतच औरंगाबाद पालिकेशिवाय इतर स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान. सत्ताधारी असल्याने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करणे दानवे यांच्या दृष्टीने सोपे काम; पण त्याच वेळी चव्हाणांसमोर मोठे आव्हान.
कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सलग पराभवामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. या दोन्ही निवडणुकांत पक्षाचा दारुण पराभव झाला. दानवेंसाठी हे आव्हान वेगळ्या कारणाने.
कारण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढून तेथे आपली सत्ता स्थापन करणे ही त्यांची कसोटी ठरू शकते. त्याच वेळी चव्हाणांना पक्षाचे हे छोटे गड टिकवायचे आहेत.

चव्हाण यांची बलस्थाने... चव्हाण आक्रमक आहेत, त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य आहे. राज्यातील प्रश्नांची जाण, मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व ही त्यांची बलस्थाने. गल्ली ते दिल्ली असे नेटवर्क असणारा विलासराव देशमुखांनंतर काँग्रेसमधील नेता; शिवाय राज्याच्या सर्वच भागांत कार्यकर्त्यांचे नेटवर्क. मराठवाड्याचा विचार केला तर येथेही कार्यकर्त्यांची फळी आहेच. देशभर काँग्रेसची पडझड होत असताना त्यांनी आपला नांदेड जिल्हा शाबूत ठेवला.

दानवेंसमोर पक्षांतर्गत आव्हान... रावसाहेब दानवे हे भाजपामधील ज्येष्ठ नेते आहेत. मराठवाड्यात चांगला संपर्क, सहज उपलब्ध होणारे मोकळे ढाकळे अस्सल ग्रामीण बाज असलेले व्यक्तिमत्त्व ही त्यांची खासियत. पक्ष केंद्रात व राज्यातही सत्तेवर असल्याने तसे संघटनात्मक आव्हान नाही. पक्षांतर्गत कुरबुरी, गटबाजी असली तरी तेवढी उफाळून आलेली नाही. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना लागलेले पदांचे डोहाळे आणि नव्या कार्यकर्त्यांची व्यवस्था या बाबींमुळे धुसफूस आहे.

Web Title: Marathwada two wagers face-to-face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.