मराठवाडा-विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता
By Admin | Published: May 6, 2017 08:35 AM2017-05-06T08:35:09+5:302017-05-06T12:17:28+5:30
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
राज्यात उष्णतेचा कहर सुरू असताना अवकाळी पावसाने तोंड वर काढले आहे. सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात द्राक्ष बाग, शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली.
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचे नुकसान झाले असून उस्मानाबाद जिल्ह्यात वीज पडून तीन दुभती जनावरे दगावली. दरम्यान, स्कायमेटनं शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.
पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. तर सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.
यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेल्या मान्सूनच्या अंदाजाशी मिळताजुळता आहे. स्कायमेटने या वर्षी सरासरी 95 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.
भारताची 60 टक्के लोकसंख्या ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून कसा असणार याविषयी सर्वांनाच सर्वाधिक उत्सुकता असते. यंदा पर्जन्यमानाच्या दृष्टीने भारतासाठी हे वर्ष सर्वसामान्य वर्ष असेल. संपूर्ण देशभरात चांगला पाऊस होईल. यावर्षी देशाच्या वार्षिक सरासरीच्या 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
याआधी स्कायमेटचा यंदाच्या पर्जन्यमानाबाबतचा अंदाज प्रसिद्ध झाला होता. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेने वर्तवली होती. त्यात 5 टक्के कमी अधिक फरक पडू शकतो. देशभरात 887 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवणार असल्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली होती.