मराठवाडा, विदर्भ दुष्काळाच्या उंबरठयावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 02:28 PM2017-08-18T14:28:21+5:302017-08-18T14:35:19+5:30
उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पण याच पावसाने महाराष्ट्रात पाठ फिरवली आहे.
मुंबई, दि. 18 - उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पण याच पावसाने महाराष्ट्रात पाठ फिरवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठयावर आहेत. ऑगस्टचा पंधरावडा संपला तरी, पावसाच्या सरी बरसत नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील पावसावर बळीराजाचे वर्षभरातील शेतीचे गणित अवलंबून असते.
पण यंदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे. मराठवाडयातही मागच्या काही दिवसात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. येणा-या दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला नाही तर, या भागात भीषण दुष्काळी परिस्थिती उदभवू शकते. दोनवर्षांपूर्वी मराठवाडयाने अशा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना केला होता.
आणखी वाचा
चिंता नको; पाऊस गाठणार सरासरी
यंदा ४५ टक्के पाऊस कमी
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्यात ८ आॅगस्टअखेर ७०४ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत ५२७ मिलिमीटर पाऊस झाला. औरंगाबाद आणि लातूर विभागातील बहुतांश भागात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव तालुक्यात, तर बीड जिल्ह्यातील आष्टी, माजलगाव, अंबेजोगाईमधील पिकांची वाढ खुंटली आहे. हीच स्थिती जालनातही आहे.
दुष्काळ जाहीर करा
मराठवाड्यात गेल्या दीड महिन्यात पावसाचा थेंब पडलेला नाही. खरीप पिके संकटात आहेत. दररोज दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुण मुले आणि मुलींमध्येही आत्महत्येचे लोण पसरले असतानाही राज्यकर्ते हातावर हात ठेवून बसले आहेत, याकडे लक्ष वेधत मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.
लातूर विभागातील ४८ तालुक्यांपैकी १५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, तर २२ तालुक्यांत ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. येथील २७.१५ लाख हेक्टरवर (१०० टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, नांदेड जिल्ह्यासह देगलूर व हिमायतनगर, परभणीतील गंगाखेड, पाथरी, पालम, जिंतूर व पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनूरी तालुक्यातील पिके सुकू लागली आहेत.