मराठवाड्याच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!
By admin | Published: July 28, 2015 02:14 AM2015-07-28T02:14:51+5:302015-07-28T02:14:51+5:30
दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात
- संजय जाधव, पैठण
दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोडलेले १० हजार ५०० क्युसेक्सने पाणी केवळ १ हजार क्युसेक्सने दाखल होत आहे.
जायकवाडीच्या मृत साठ्यातून जवळपास १७.३१७ दलघमी पाणी उपसण्यात आले आहे. या साठ्यात ४० टक्के गाळ साचलेला असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे गंभीर सावट पसरलेले आहे. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणात पाणी आले नाही, तर मोठी पाणीकपात करूनही वर्षभर पाण्याचे नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यातच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे.
काय आहे नियम?
समन्यायी पाणीवाटपासंदर्भात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने केलेल्या नियमानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर कोणत्याही कालव्याद्वारे पाणी वळविण्यात येऊ नये, तसेच उच्चपातळी बंधारे मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमास धाब्यावर बसवून अन्याय केला आहे.
तब्बल ५२ तासांनी पाणी
दारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख या बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु जवळपास सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली. बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासांत पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले आहे.
- १५ आॅक्टोबरनंतर आढावा घेऊन वापरलेले पाणी व प्रकल्पात शिल्लक असलेला साठा विचारात घेऊन खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दारणा धरणातून पाणी कसे सुटले याबाबत मला माहीत नाही. तेथील मुख्य अभियंत्यांना विचारा, ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.