मराठवाडा पाणीप्रश्नी अंतिम सुनावणीस सुरुवात
By Admin | Published: March 10, 2016 03:36 AM2016-03-10T03:36:22+5:302016-03-10T03:36:22+5:30
नाशिक-अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध, अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत
मुंबई : नाशिक-अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध, अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील अंतिम सुनावणीस बुधवारपासून सुरुवात झाली. गुरुवारीही या याचिकांवर युक्तिवाद सुरूच राहणार आहे.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) ७ आॅक्टोबर रोजी नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी व पिकांसाठी सोडण्यात येणार असल्याचे जीएमआयडीसीने जाहीर केले. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरच्या शेतकऱ्यांनी व साखर कारखानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तर मराठवाड्याच्या रहिवाशांनीही जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने १२. ८४ टीमएसीपैकी १० टीमएसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची परवानगी सरकारला दिली होती. त्यानंतर मात्र, उच्च न्यायालयाने उर्वरित २.८४ टीमएसी पाणी जायकवाडीत सोडण्यास नकार देत, अंतिम सुनावणीनंतर यावर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यानुसार, बुधवारपासून मराठवड्यातील पाणीप्रश्नासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील अंतिम सुनावणीस सुरुवात झाली. या याचिकांवरील सुनावणी गुरुवारीही सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)