मराठवाडा जलमय
By Admin | Published: October 3, 2016 05:46 AM2016-10-03T05:46:21+5:302016-10-03T05:46:21+5:30
मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत.
औरंगाबाद : सलग तीन वर्षांच्या दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडल्याने बिंदुसरा, मांजरा, तेरणा, तावरजासह अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. औरंगाबाद व जालना वगळता संपूर्ण विभागात पाणीच पाणी झाले आहे. हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली. बिंदुसरेचे पाणी रविवारी पहाटेच बीडमध्ये घुसल्याने आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक गावे रिकामी केली आहेत. उस्मानाबादमध्ये २४ तासांत तब्बल १५६ मि.मी. म्हणजेच ‘दुप्पट’ अतिवृष्टी झाली. तेरणा धरण ६ वर्षांनी ओव्हरफ्लो झाले. माजलगाव धरणाचे दरवाजे उघडल्याने परभणीत गोदावरीला उधाण आले आहे.नांदेडमधील लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. डोंगरगावला तब्बल १६ तास पुरात अडकलेल्या २३ जणांची शनिवारी रात्री सुटका करण्यात आली. मांजरा नदीपात्रात अडकलेल्या तिघांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत़ नांदेडमधील अकोला-हैदराबाद व्हाया देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग देगलूरजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तब्बल १७ तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाला होता.तुळजापूरमध्ये सत्यजीत वाघे यांच्या घराची भिंत ढासळली. त्यात त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर खान्देशात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीत दोन दिवसांत ९ जणांचे बळी गेले आहेत.नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यात आठ दिवसांत विविध दुर्घटनांत ३६ जणांचा मृत्यू झाला, त्यात बीड येथे सर्वाधिक १८ जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबईसह कोकण, सोलापूर, नगरमध्ये पाऊस सुरू आहे. साताऱ्यातील दुष्काळी माण, खटाव व फलटणमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातीलही प्रकल्प भरले आहेत.