मराठवाड्यातील पाणीटंचाईवर तंत्रज्ञानाने मात करणार
By Admin | Published: May 29, 2016 12:42 AM2016-05-29T00:42:36+5:302016-05-29T00:42:36+5:30
सदैव पाणी टंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या मराठवाड्याची ‘तहान’ तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरुपी भागवण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला.
मुंबई : सदैव पाणी टंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या मराठवाड्याची ‘तहान’ तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरुपी भागवण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला. माझगाव डॉक येथे शनिवारी आयोजित पाणबुडी कार्यशाळेचे उद्घाटन पर्रिकर यांच्या हस्ते झाले; यावेळी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादावेळी ते बोलत होते.
मनोहर पर्रिकर म्हणाले, माझगाव डॉकने पाणीबुडी कार्यशाळेसाठी सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. विशेष म्हणजे माझगाव डॉककडून तयार करण्यात आलेली ‘कलवरी’ ही पाणीबुडी यावर्षीच्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्यात येईल. या पाणीबुडीचे पहिले कंत्राट रद्द करण्यात आले असून, हे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आले आहे.
दुष्काळप्रश्नावर बोलताना मनोहर पर्रिकर यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. ते म्हणाले, माझगाव डॉकने कार्यशाळेच्या माध्यमातून रेनवॉटर हार्वेस्टींगवर भर दिला आहे. नव्या कार्यशाळेत डॉकने रेनवॉटर हार्वेस्टींग, सांडपाणी प्रक्रिया व आॅईल वॉटर प्रक्रियेवर भर दिला आहे. हे कौतुकास्पद आहे. असे स्तुत्य उपक्रम राबवताना माझगाव डॉकने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी हातभार लावला पाहिजे. अशा तंत्रज्ञानातून मराठवाड्याला मदत केली तर नक्कीच दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल.
दरम्यान, आपण संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्य आयात करत आहोत. मात्र आता संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्याची देशातच निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल, असेही मनोहर पर्रिकर यांनी यावेळी आवर्जून नमुद केले. (प्रतिनिधी)
माझगाव डॉक येथील अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज पाणीबुडी कार्यशाळेसाठी अंदाजे १५३ कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. कार्यशाळेत पाच पाणबुड्यांच्या बांधणीचे कामकाज सुरु आहे. येथे जलसंधारणाचे विविध प्रयोग साकारण्यात येतील.