मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

By Admin | Published: July 28, 2016 01:03 AM2016-07-28T01:03:13+5:302016-07-28T01:03:13+5:30

जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे

Marathwada waters run | मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

मराठवाड्याच्या पाण्याची पळवापळवी

googlenewsNext

औरंगाबाद : जायकवाडी धरण रिकामे असूनही ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कालव्यांद्वारे राजरोस पळविले जात आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. पालखेड धरणाच्या कालव्यातूनही तब्बल १० दिवस मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकल्पांच्या कालव्यातून सुमारे दोन टीएमसी पाणी पळविण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
गोदावरी खोऱ्यात नगर, नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढली आहे. त्यामुळे समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार खाली जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी कालव्यांद्वारे हे पाणी वळविण्यात आले.
सुरुवातीला नांदूर-मधमेश्वर आणि पालखेड धरणाचे कालवे सुरू करण्यात आले. त्यातील नांदूर- मधमेश्वर प्रकल्पाचे दोन्ही कालवे १७ दिवसांनंतरही सुरूच आहेत. नांदूर- मधमेश्वरच्या कालव्यातून श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांत हे पाणी वळविले गेले आहे.
पालखेड प्रकल्पाचा कालवाही १० दिवस सुरू होता. मात्र, हे पाणी वळविले जात असताना, जलसंपदा विभाग किंवा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्याही नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून १०० क्युसेक्सआणि उजव्या कालव्यातून १५० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. दोन्ही प्रकल्पांच्या कालव्यांमधून आतापर्यंत सुमारे २ टीएमसीपेक्षा जास्त पाणी वळविले गेल्याची
माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

जायकवाडी मृतसाठ्यातच
वरच्या भागातून पाणी न आल्यामुळे जायकवाडी धरण अजूनही रिकामेच आहे. हे धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी ३७ दलघमी पाण्याची गरज आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून सध्या धरणात १,६१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

म्हणे आरक्षणानुसार पाणी !
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी वरच्या भागात कालव्याद्वारे वापरले गेलेले पाणी समन्यायी पाणीवाटपाचा निर्णय घेताना विचारात घेतले जाणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘वरच्या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी म्हणून पाण्याची मागणी नोंदविलेली आहे. त्यांच्या आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जात आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबर रोजी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटप केले जाईल. त्यामुळे कालव्यांद्वारे वापरलेले पाणी हिशोबात धरण्यात येईल. कालव्यांतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा हिशोब ठेवण्यात येत आहे.’

वरच्या धरणांमध्ये ५२ टक्के साठा
जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणांमधील सरासरी जलसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. भंडारदरा धरण ५८% भरले असून, गंगापूर धरण ७५ टक्के, नांदूर-मधमेश्वर बंधारा ८५ % आणि भावली प्रकल्प ९९ टक्के भरला आहे.
सद्य:स्थितीत वरच्या भागातील २१ सिंचन प्रकल्प सरासरी ५२ टक्के भरले आहेत.

Web Title: Marathwada waters run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.