‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’
By admin | Published: January 1, 2016 09:53 PM2016-01-01T21:53:00+5:302016-01-02T08:28:54+5:30
चिपळूण शहर : हरी मुद्राळे यांचे देहदान; मृतदेह कृष्णा हॉस्पिटलाला सुपूर्द
चिपळूण : ‘मरावे परी कीर्तीरुपे उरावे’ या उक्तीप्रमाणे शिक्षकीपेशातून निवृत्त झालेल्या शहरातील पेठमाप येथील हरी कृष्णा मुद्राळे (८६) यांनी मरणोत्तर देहदान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांचा मृतदेह गुरुवारी कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड येथे सुपूर्द करण्यात आला आहे. शिक्षक म्हणून सेवेत असणाऱ्या हरी मुद्राळे यांनी संस्कारमय पिढी घडवण्याचे काम केले. धार्मिक व सामाजिक कार्यात ते हिरीरीने भाग घेत असत. सर्वधर्मसमभावाचे ते एक प्रतीक होते. भजनाच्या कार्यक्रमातही ते गायन करीत असत. संस्कारक्षम पिढी घडवताना इतरांना नवा आदर्श घालून देण्याचे कामही त्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी देहदानातून समाजाला चांगल्या संस्काराचा धडा दिला आहे.मुद्राळे यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागले म्हणून त्यांना येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
मुद्राळे (गुरुजी) यांनी आपल्या मित्र परिवाराशी मरणानंतर देहदान करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी कोणतेही कारण पुढे न करता त्यांच्या संकल्पनेला मान्यता देऊन कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड येथे संपर्क
साधला.त्यासाठी साईनाथ कपडेकर, व्यावसायिक जयंत आंबुर्ले यांच्या मदतीने मुद्राळे यांचा मृतदेह कृष्णा हॉस्पिटलच्या ताब्यात देण्यात आला. मरणानंतर कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार विधी केले जाणार नाहीत. मुद्राळे हे एक कुशल मार्गदर्शक तसेच श्री सिध्दिविनायक मंदिर, श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरीचे ट्रस्टी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (वार्ताहर)
शिक्षकीपेशात ज्ञानार्जन करणाऱ्या मुद्राळेंनी ठेवला समाजासमोर एक आदर्श.
निधनानंतर कोणताही धार्मिक विधी न करण्याचा संकल्प.
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी दिला मृतदेह.