मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे...!
By Admin | Published: May 5, 2017 03:39 PM2017-05-05T15:39:18+5:302017-05-05T15:39:18+5:30
‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे देहदान आणि अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो
>ऑनलाइन लोकमत/संतोष हिरेमठ
औरंगाबाद, दि.05 - ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे देहदान आणि अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो डॉक्टर घडत आहेत. तर एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, डोळे या अवयवांच्या दानामुळे किमान सहा व्यक्तींना नवीन आयुष्य मिळते. विविध माध्यमातून होणाºया जनजागृतीमुळे मराठवाड्यात रक्तदान, नेत्रदानाबरोबर देहदान आणि अवयवदानात वाढ होत असून ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाºया व्यक्तींना मदत करण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते.
मानवी अवयवांचे दान करून आणि अशा दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करून दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने देता येणारे अवयवदान देऊन काही व्यक्तींना जीवदान आणि नवसंजीवनी देऊ शकतो.
तीन वर्षात ४८ देहदान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात ८ ते १० मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला १८ पर्यंत आले आहे. गेल्या तीन वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ४८ देहदान झाले. रासायनिक प्रक्रियेनंतर हे मृतदेह अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावतात.
पाच वर्षाच्या चिमुकल्याचे देहदान
मोठ्या व्यक्तींचे देहदान नियमित होतात. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते.
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले. पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता-पित्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) त्याचे देहदान करीत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
अवयवदानाची चळवळ
अवयवदानासाठी पारंपरिक मृत्यूची व्याख्या बदलून ‘ब्रेन डेड’ ही व्याख्या कायद्याने संमत केली आहे. यामध्ये रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी राम मगर या ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीने वेग पकडला. गेल्या दीड वर्षात १२ अवयवदान झाले. यातून 24 किडन्या, 11 यकृत, 7 हृदयाचे प्रत्यारोपण झाले. तसेच नेत्रदानही झाले. या अवयवदानामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले.
कुटुंबियांचा सत्कार करणार ...
देहदानात वाढ झाली असून गेल्या तीन वर्षात ४८ देहदान झाले. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाºयांच्या कुटुंबियांचा शरीररचनाशास्त्र विभागातर्फे आॅगस्ट महिन्यात सत्कार करण्यात येणार आहे.
-डॉ. शिवाजी सुक्रे,उपअधिष्ठाता तथा विभागप्रमुख,शरीररचनाशास्त्र, घाटी
आणखी जनजागृती वाढावी...
अवयवदान ब-यापैकी होत आहे. अवयवदानाविषयी आणखी जनजागृती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.
-डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी