मार्च, एप्रिल एकही मुहूर्त नाही! नोव्हेंबर महिन्यात धूमधडाक्यात होणार शुभमंगल सावधान; मे महिन्यातील उकाड्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:03 AM2023-10-16T09:03:41+5:302023-10-16T09:04:29+5:30
हिंदू समाजात मुहूर्त पाहूनच इच्छुक वधू-वर बोहल्यावर उभे राहतात २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च, एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त एकही नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती, तर मे महिन्यात काही जोडप्यांची दणक्यात लग्न झाली हिंदू समाजात पितृपक्षात विवाह केले जात नाहीत, आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना नोव्हेंबरमध्ये धुमधडाक्यात विवाह करता येणार आहे.
हिंदू समाजात मुहूर्त पाहूनच इच्छुक वधू-वर बोहल्यावर उभे राहतात २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल्ल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी आपले लग्न पुढे ढकलले. जूनमध्ये मुहूर्त असले तरी लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी पावसाळ्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला असून, पितृपक्षामुळेदेखील अनेक विवाह रखडले आहेत.
अनंत चतुर्दशीच्या पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष दि. २९ सप्टेंबर पासून १४ ऑक्टोबर या कालावधीत होता. पितृपक्षात तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, अशी समज आहे.
२०२३ मध्ये हे आहेत लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५
आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणते
ऑक्टोबर : १६, २०, २२, २३, २४, २६
नोव्हेंबर : १, ६, १६, १८, २०, २२
नातेवाइकांची लगबग सुरू
लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जूननंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात लग्न कण्यासाठी नातेवाइकांची लगबग सुरू झाली आहे सभागृह, लॉन, हॉटेल्स तसेच मंगल कार्यालये बुक केली जात आहेत.
बँड बाजाची जोरदार तयारी
लग्नसोहळा एकदाच होत असल्याने, विवाह दणक्यात साजरा करण्यासाठी बँड बाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. त्यासाठी आतापासून बुकिंग केले जात आहे. लग्नात येणाऱ्या यजमानांना चविष्ट जेवण खाऊ घालण्यासाठी मेनू ठरवायचा याचे बेत आखले जात आहेत.
येत्या दोन महिन्यांत विवाह
पितृपक्षात घरात सुख-शांती नांदते, असे लोक मानतात या काळात शुभकार्य केली जात नाहीत, त्यामुळे नुकतेच जमलेले विवाह येत्या दोन महिन्यांत होणार आहेत.