मार्च महिन्यातच नदीचे पात्र झाले ‘ड्राय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:17 PM2019-03-24T21:17:39+5:302019-03-24T21:19:11+5:30
शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी पुरवठा केला जात आहे.
गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगानदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना एप्रिल ते मे महिन्यादरम्यान पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यंदा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र ड्राय झाल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाला वैनगंगा नदीच्या पात्रात बंधार तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढविण्याची वेळ आली. बंधारा तयार केल्यामुळे किमान महिनाभर पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. मात्र तापमान वाढल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणातून कालव्याच्या माध्यमातून पाणी आणून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी नहराची दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच हे काम सुरू करण्याची गरज आहे.
गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी आणण्याची गरज पडणार आहे. त्यादृष्टीकानोतून नियोजन करण्यात आले आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्यात आली आहे.
- राजेंद्र मडके, उपविभागीय अभियंता मजीप्रा.