सागरी मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

By admin | Published: July 9, 2017 02:38 AM2017-07-09T02:38:51+5:302017-07-09T02:38:51+5:30

वाहतुकीच्या कटकटीतून सुटका करीत मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा सागरी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या

The march of the sea route to December | सागरी मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

सागरी मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाहतुकीच्या कटकटीतून सुटका करीत मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा सागरी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी, कोस्टल रोडसाठी सल्लागार व ठेकेदाराच्या नेमणुकीसाठी निविदा मागवण्यात येत आहेत. त्यानुसार डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीत केलेल्या सादरीकरणावेळी दिली.
या प्रकल्पाचे श्रेय आपल्या पदरात टाकण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी सादरीकरण केले. या वेळी किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून एकूण ३५.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सागरी मार्गाचे काम झाल्यावर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहेत. तसेच या मार्गामुळे सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

अशी झाली प्रकल्पाची सुरुवात
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरिमन पॉइंट ते वर्सोव्यापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प व्यवहार्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी २०११ मध्ये समिती स्थापन केली होती. मात्र मच्छीमारांचा विरोध, पर्यावरणवादी संस्थांचा आक्षेप अशा अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला. राज्यात सत्तांतरानंतर या प्रकल्पाचा लगाम भाजपाच्या हातात गेला.

वाहतूककोंडी फुटणार
या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपाटी येथून निघालेला हा बोगदा थेट प्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होणार नाही. तिथून हा प्रकल्प वांद्रे सागरी सेतू ते गोराई असा प्रवास करेल. याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातून उपनगरात जाण्यास लागणारा दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा होणार आहे.

नरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग
पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी-लिंक या ९.९८ किमीचे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.
त्यानंतर वांद्रे सी-लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होईल, असे माचीवाल यांनी स्पष्ट केले. या मार्गावर सागरी भिंतींची उभारणी केली जाईल. त्यामुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-भाजपात
श्रेयाची लढाई
नौदल, तटरक्षक दल, मेरीटाइम बोर्ड, राज्य पर्यावरण खात्याची परवानगी भाजपाने आपले वजन वापरत मिळवली. याचे श्रेय घेणारे फलकही भाजपाने मुंबईभर लावले. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकल्प आपला असल्याचा दावा केला होता.
शिवसेना पक्षप्रमुखांनी यापुढे जात आपल्या नेतेमंडळी व नगरसेवकांसह या प्रकल्पाची पाहणी करीत भूमिपूजन पुढच्या पावसाळ्यात होईल, असे परस्पर जाहीर केले.

अत्यावश्यक सेवा सुसाट : कोस्टल रोडवर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणेतीन मीटर रुंदीची असेल. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्यांचा मार्ग खुला होणार आहे.

अशाही काही सुविधा : कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी वाहनतळाचीही सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Web Title: The march of the sea route to December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.