वेगळ्या विदर्भासाठी निघणार मार्च
By admin | Published: July 7, 2014 01:06 AM2014-07-07T01:06:09+5:302014-07-07T01:06:09+5:30
स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पायी मार्चचा नारा विदर्भ जॉर्इंट अॅक्शन समितीने रविवारी दिला. रविभवनात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक
नागपूर-दिल्ली पायी जाणार : विदर्भ जॉर्इंट अॅक्शन समितीचा निर्णय
नागपूर : स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर ते दिल्ली पायी मार्चचा नारा विदर्भ जॉर्इंट अॅक्शन समितीने रविवारी दिला. रविभवनात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी व्हेरायटी चौक येथून हा मार्च निघणार आहे. सात राज्यातून तो मार्गक्रमण करीत २८ दिवसांनी दिल्लीत पोहचेल. येथे स्वतंत्र विदर्भासह २४ मागण्यांचे निवेदन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटून देण्यात येईल.
शहरातील २२ संघटनांचा या समितीमध्ये समावेश आहे. माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या सर्वच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नागपूर-दिल्ली पायी मार्चची रूपरेषा ठरविण्यात आली. या संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पत्रकार व समितीचे संयोजक प्रभाकर कोंडबत्तुनवार म्हणाले, शिक्षक दिनी हा पायी मार्च निघेल. महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या सहा राज्यातून हा मार्च जाईल. साधारण २८ दिवसांचा हा मार्च २५ ठिकाणी मुक्काम करेल. विदर्भ महाराष्ट्रात विलीन होऊन ५४ वर्षे झाली म्हणून या मार्चमध्ये कमीतकमी एवढे पदयात्री राहतीलच. दिल्लीत हा मार्च पोहचल्यावर राष्ट्रपती व पंतप्रधान यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल.
या भेटीत स्वतंत्र विदर्भासह २४ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल. यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत, भारनियमन, भाववाढ, नक्षलवाद, जिल्ह्याचे विभाजन या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येईल. बैठकीला छैलबिहारी अग्रवाल, रमेश ढोमणे, बलदेव सोनेवाने, एम.पी.तिवारी, लता मानकर, राजधर भेलावे, राहुल थोरात, क्लॉडियस पीटर, रोशन हिरणवार, भगवानदास राठी, माजी आमदार भोला बढेल, संगीता खोब्रागडे, आशा पाटील, शेख मुहमुद्दीन, कैलास चरडे, आनंद चौरे, विलास भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येत विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)