मर्दानी नार मी... भिणार नाय कोणाला गं!
By admin | Published: January 28, 2015 10:41 PM2015-01-28T22:41:00+5:302015-01-29T00:06:12+5:30
पथनाट्याद्वारे जनजागृती : वाहता बसस्थानक परिसर पंधरा मिनिटांसाठी झाला स्तब्ध
सातारा : ‘मर्दानी नार मी, भिणार नाय कोणाला गं’ असं म्हणत सातारच्या तरुणी आज अक्षरश: रस्त्यावर उतरल्या. पथनाट्याच्या माध्यमातून इतर मैत्रिणींना बेधडक जगण्याचा संदेश देत त्यांनी ‘लोकमत’च्या मोहिमेला वेगळी उंची दिली.
एसटी स्टॅण्ड परिसर तसा कायमच गजबजलेला... पण संध्याकाळची वेळ म्हणजे वारूळातून मुंग्या बाहेर पडल्यासारखी गर्दी... बुधवार संध्याकाळी मात्र ही गर्दी तब्बल पंधरा मिनिटांसाठी थांबली. खदखदून हसणं, शिट्या आणि स्तब्धता अशा वातावरणात येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पथनाट्य अनुभवले. ‘महिला म्हणून जगताना महिला असल्याचा अभिमान बाळग... कोणी तिरकस नजर टाकली तर त्याला निक्षून जाब विचार... ऊठ आता लढायला शीक,’ असं म्हणत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पथनाट्याद्वारे एसटी स्टॅण्ड परिसरात जनजागृती केली. साताऱ्यात रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का, याविषयी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महिलांची सुरक्षितता हा विषय चांगलचा ऐरणीवर आला होता. त्यानंतर समाजातील विविध स्तरातून याविषयी आवाज उठविला गेला. ‘मर्दानी नार मी... भिणार नाही कुणाला गं..’ या वाक्याने पथनाट्याची सुरूवात झाल्यानंतर पुढील पंधरा मिनिटे स्टँण्डवर केवळ या पथनाट्याचा आवाज गुंजला. पथनाट्याचे दोन भाग करून छेडछाडीला भिण्यापेक्षा सबळ होण्याचा संदेश देण्यात
आला. (प्रतिनिधी)
पथनाट्याने केली वातावरण निर्मिती
मुख्य बसस्थानक परिसरात संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अनेकांची घरी जाण्याची घाई असल्यामुळे या परिसरात कोणाला कोणाकडे पाहायलाही वेळ नसतो. पण बुधवारची संध्याकाळ त्याला अपवाद ठरली. घराच्या ओढीने लगबगीने बसस्थानकात जाणारी पावले थबकली ती पथनाट्य पहायला आणि ऐकायला! जिल्ह्यातील विविध कोपऱ्यातून आलेल्या अनेक प्रवाशांनी आवर्जून थांबून हे पथनाट्य पाहिले.
यात यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय जकातवाडीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात उमेश काळे, अभिजित जाधव, सुशांत जाधव, दत्तात्रय कोळेकर, साईनाथ गांगोडे, झिम्माराणी बीडगर, सायली अडसुळे, प्रियांका अपशिंगे, मंगेश सोनवलकर यांनी सहभाग घेतला. अरुण जावळे यांनी या पथनाट्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.