मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे
By Admin | Published: July 3, 2015 06:40 PM2015-07-03T18:40:30+5:302015-07-03T18:40:30+5:30
रुग्णांचे अतोनात हाल करणारा मार्ड डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व डॉक्टरांमध्ये शुक्रवारी झालेली चर्चा सफल झाली असून
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि ०३ - रुग्णांचे अतोनात हाल करणारा मार्ड डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व डॉक्टरांमध्ये शुक्रवारी झालेली चर्चा सफल झाली असून सुमारे ९० टक्के मागण्या शासनाने मान्य केल्यामुळे संप मागे घेण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज रात्री ८ वाजल्यापासून डॉक्टर्स कामावर रुजू होतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या अनेक मागण्यांमधे प्रा. हुमणे यांची बदली करण्याचा निर्णय, बंधपत्रीत सेवेकरिता जास्तीतजास्त जागा उपलब्ध होण्याकरिता वरिष्ठ निवासी या संवर्गातील रिक्त जागांवर बंधपत्रीत उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय, बंधपत्रीत सेवा वाटप कालावधी ३ महिन्यांवरून २ महिने करण्याचा निर्णय, राज्यातील निवासी डॉक्टरांना पाच हजार रुपयांची पगारवाढ आदी महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
रुग्णसेवेवर विपरीत परिणाम
मार्डने त्यांच्या १० प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील ४ हजार निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पण, सीनियर डॉक्टर्सच्या उपस्थितीने अधिक हाल होणे टळले. वरिष्ठ डॉक्टर अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना दिसत होते. या डॉक्टरर्सनी बाह्यरुग्ण विभागाच्या बरोबरीनेच शस्त्रक्रियादेखील केल्या. निवासी डॉक्टरांच्या मास बंकचा पहिला दिवस असल्याने फार अडचण आली नाही. पण, उद्याही निवासी डॉक्टर संप सुरू असल्यास काय परिस्थिती उद्भवेल हे सांगणे कठीण असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र आता संप मागे घेण्यात आल्यामुळे रुग्णांचे हाल टळणार आहेत.
सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू
वेतनवाढीच्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप एका बाळाच्या जीवावर बेतला. मुंबईतील केईएम रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचाराअभावी सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. उल्हासनगरमधील एक दाम्पत्त्य त्यांच्या लहान बाळाला घेऊन केईएम रुग्णालयात आले होते. मात्र डॉक्टर नसल्याने त्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.