मार्डचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; बैठक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:02 AM2021-10-03T06:02:28+5:302021-10-03T06:08:18+5:30
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र राज शासन तयार नसल्याची प्रतिक्रिया मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे पाटील यांनी दिली.
मुंबई : मार्डच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकार मार्डच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करीत दुसऱ्या दिवशीही संप सुरू ठेवला. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे ते मार्डच्या मागण्या पूर्ण करण्यास असफल ठरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संपाच्या दुसऱ्या दिवशी ‘मार्ड’ संघटनेकडून देण्यात आला आहे.
कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस असून, निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप वेळ दिला नसल्याचे मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांची बाह्य रुग्ण कक्षात (ओपीडी) नियुक्ती केली. मात्र, २ ऑक्टाेबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका रुग्णालयात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, सायंकाळी उशिरा इंटर्न डॉक्टरांच्या अस्मी संघटनेने तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने मार्डच्या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला.
संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर दिवशी राज्य अहिंसा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपित्यांना मानवंदना म्हणून आंदोलनादरम्यान राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मार्डतर्फे रक्तदान करून आपला सत्याग्रह असाच पुढे चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले. नागपूर, अंबेजाेगाई, यवतमाळ, नांदेड या सरकारी रुग्णालयात निवासी डाॅक्टरांनी रक्तदान शिबिरांचे आयाेजन केले हाेते, तर राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांत निवासी डाॅक्टरांनी साफसफाई अभियानाचे आयाेजन करण्यात आले होते.
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, मात्र राज शासन तयार नसल्याची प्रतिक्रिया मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे पाटील यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीदेखील अद्याप चर्चेसाठी वेळ दिली नाही, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबराेबरही चर्चा करण्यास तयार आहाेत, असेही त्यांनी म्हटले. या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका ओपीडीत शुकशुकाट दिसून आला.