मारियांना ‘सायोनारा’!

By admin | Published: September 9, 2015 05:18 AM2015-09-09T05:18:31+5:302015-09-09T05:18:31+5:30

मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली.

Marianas 'Cenonara'! | मारियांना ‘सायोनारा’!

मारियांना ‘सायोनारा’!

Next

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. जपान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी हा फेरबदल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांना ‘सायोनारा’ (बाय-बाय) केल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, मारिया यांच्या अशा तडकाफडकी बदलीवर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून टीकेचा जोरकस सूर उमटल्याने शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडेच ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
जपानला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री १० वाजता गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्याशी वर्षा निवासस्थानी चर्चा करून मारिया व अहमद जावेद यांच्या फेरबदली आदेशावर सही केली. गृहविभागाने मंगळवारी तातडीने मारिया यांच्या पदोन्नती व बदलीचे आणि जावेद अहमद यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नेमण्याचे आदेश जारी केले. वास्तविक, मारिया यांची पदोन्नती सप्टेंबरअखेर होणार होती. मात्र, २२ दिवस (पान २ वर)

विदेश दौऱ्यापूर्वी बदल्या
विदेश दौऱ्यावर रवाना होताना बदल्या करण्याचा जणू प्रघातच मुख्यमंत्र्यांनी पाडला असून, असा अनुभव आज चौथ्यांदा आला. विदेश दौऱ्यावर जाताना ते महत्त्वाच्या आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात.

अखेर जावेद यांना मिळाली संधी
दीड वर्षापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेमणुकीवरून बरेच राजकारण झाले. मारिया यांच्यासोबत अहमद जावेद हेदेखील शर्यतीत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहामुळे मारिया यांची वर्णी लागली. अखेर निवृत्तीपूर्वी पाच महिने का होईना जावेद यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
१९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद हे पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.

यापूर्वी अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
१८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मारियांची बदली का? राष्ट्रवादीचा सवाल
पदोन्नती देणे, बदली करणे हा सरकारचा अधिकार आहे. पण, सरकारकडून योग्य ती स्पष्टता झाली पाहिजे. राकेश मारिया हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. याकूब मेमनच्या दफनविधीच्या काळात त्यांनी शहरातील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती. सध्याच्या शीना बोरा प्रकरणाचा तपासदेखील योग्य रीतीने सुरू होता. त्यांची नियमानुसार ३० सप्टेंबर रोजी बदली होणार असताना अगोदरच अशा पद्धतीने तडकाफडकी बदली केली जाते. याबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता झाली पाहिजे, असेही तटकरे म्हणाले. तर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेगळाच शोध लावला. ते म्हणाले, मारिया यांच्या बदलीमागे दिल्ली आणि गुजरातमधील बड्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे.

मारिया रजेवर
आकस्मिक बढतीमुळे नाराज झालेल्या मारिया यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतर ते किरकोळ रजेवर गेलेले आहेत. या निर्णयाबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.

बदलीमागील कारणे?
1 ) ललित मोदी प्रकरणात त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता; तरीही त्यांना तेथे ठेवले गेले. कारण सप्टेंबरमध्ये तशीही त्यांची बदली होणार होती.
2) भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्तक्षेपामुळे मारिया यांची बदली
३० सप्टेंबरपर्यंत टाळण्याचे ठरले होते; मात्र शीना बोरा प्रकरणी मारिया अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास तपासच करू देत नव्हते. त्यांचा व्यक्तिगत ‘इंटरेस्ट’ अनेक प्रश्न निर्माण करत होता.
3) शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हा या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला.

महिला-मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य
शहरातील कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षा आणि सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात सन्मानजनक वागणूक मिळणे, या तीन बाबींवर आपले प्राधान्य राहणार आहे.
- अहमद जावेद, पोलीस आयुक्त

Web Title: Marianas 'Cenonara'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.