‘मेरी कोम’ युवकांना प्रेरणा देणारा चित्रपट

By admin | Published: August 11, 2014 12:57 AM2014-08-11T00:57:41+5:302014-08-11T00:57:41+5:30

‘मेरी कोम’ अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि प्रेरणा देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करताना मजा आली आणि अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. मी स्वत: खेळाडू नसल्यामुळे

'Marie Com' movie inspired by youth | ‘मेरी कोम’ युवकांना प्रेरणा देणारा चित्रपट

‘मेरी कोम’ युवकांना प्रेरणा देणारा चित्रपट

Next

अभिनेत्री प्रियंका चोप्रा : लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळी चर्चा
नागपूर : ‘मेरी कोम’ अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि प्रेरणा देणारा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करताना मजा आली आणि अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. मी स्वत: खेळाडू नसल्यामुळे मला खेळाडूचे ‘स्पिरीट’ आणावे लागले. बॉक्सिंगमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या आणि विवाहानंतर जुळी मुले झाल्यावर पुन्हा या खेळात परतणाऱ्या मेरी कोमचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या चित्रपटाने अपयशानंतर खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहण्याचे बळ देशातील युवकांना मिळेल. किमान तशी प्रेरणा तर नक्कीच मिळेल, असा विश्वास सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने व्यक्त केला.
लोकमत परिवाराच्यावतीने तिच्या आगामी ‘मेरी कोम’ चित्रपटाबद्दल तिच्याशी संवाद साधला असता लोकमतच्या सहकाऱ्यांशी तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. लोकमतच्या विविध उपक्रमांची तिने भरभरून प्रशंसा केली. मेरी कोम म्हणजे एक महान महिला खेळाडू आहे. हा चित्रपट स्वीकारण्याआधी मी तिला भेटले होते. तिचे कार्य मला माहीत होते पण तिच्यावर आधारित चित्रपटात मला तिची भूमिका मिळेल, याची कल्पना नव्हती. मेरी कोमने पाच वेळा बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप मिळविली आहे, हे अनेकांना माहीत नाही. जुळी मुले झाल्यावरही तिने दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळविला आहे. एकाच वेळी मुले, घर आणि करियर समर्थपणे सांभाळणारी ही यशस्वी महिला आहे. या चित्रपटाची कथा माझ्याकडे आल्यानंतर मी मेरीच्या गावात गेले. तिचे जिम, तिची शाळा, चर्च, तिचे कुटूंब जवळून अनुभवले. कारण तिची भूमिका साकारताना तिच्या संपूर्ण वातावरणाचा अभ्यास केल्याशिवाय या भूमिकेला मी न्याय देऊ शकत नव्हते. तिच्या आतापर्यंतच्या आयुष्याने मला स्वत:ला खूप प्रभावित केले आहे. त्यात मलाच का भूमिका का दिली, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे माझ्यासारखी दुसरी अभिनेत्रीच नाही ना! असे उत्तरही तिने स्वत:च दिले.
या चित्रपटासाठी मी बॉक्सिंग शिकले. माझ्यासाठी हे सारेच कठीण होते. खेळाडूची एनर्जी मिळविण्यासाठी आणि शारीरिक दृष्ट्या स्वत:ला सक्षम करण्यासाठी मला बरेच परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळेच चित्रिकरणाला जास्त वेळ लागला. काही वेळेला चार महिन्यांची विश्रांतीही घ्यावी लागली. मेरी ‘लेफ्ट हॅण्डर’ आहे मी ‘राईट हॅण्डर’ पण मला तिच्यासारखे करताना सारे काम डाव्या हाताने करणे शिकावे लागले. मेरीने तिचा विवाहाच्या गाऊनचेही चित्र आम्हाला दिले. त्यावरूनच आम्ही सारेच नव्याने तयार केले. साधारणत: प्रत्येक स्त्रीला आवडते तसेच तिलाही नटणे, तयार होणे आणि फॅशनेबल राहणे आवडते. मेरीची ही कथा तिने सांगितल्याप्रमाणेच अगदी खरीखुरी आहे. चित्रपट पाहिल्यावर मेरी, तिचा पती, मी आणि आमची संपूर्ण टीमही खूप रडलो. कारण हा संघर्षच तसा होता. यात तिच्या वयाच्या आठव्या वर्षापासून आॅलिम्पिकपर्यंतचा प्रवास आहे.
ज्या वेळी आमचे चित्रीकरण सुरू होते त्यावेळी मेरीची जुळी मुले दोन महिन्यांची होती. मला स्वत:ला लहान मुले खूप आवडतात त्यामुळे मी देखील त्यांच्याशी भावनात्मक गुंतले होते. स्वत:चे करिअर, मुले सांभाळण्यातला हा संघर्ष समजून घेणे माझ्यासाठी कठीण होते. सिझेरियन झाल्यावर पुन्हा बॉक्सिंगसाठी स्वत:ला शारीरिक पातळीवर सिद्ध करणे कठीण आहे. पण मेरीने हे करून दाखविले. यातून एका खेळाडूची शिस्त, समर्पण आणि त्याचे मूल्य मला जवळून अनुभवता आले. क्रीडाप्रकारात खेळाडू विशिष्ट ध्येयाने प्रेरित असतो कारण त्या प्रकारात तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करीत असता. आपल्या परिश्रमावर असलेली निष्ठाही मला समजून घेता आली. दोन लहान मुलांना सांभाळून नव्याने स्वत:ला सिद्ध करण्याची, त्यासाठी परिश्रम घेण्याची जिद्द मला जास्त महत्त्वाची वाटते. सामान्य आयुष्यात शिस्त, समर्पण आणि महत्त्वाकांक्षा फारशी नसते. पण एखादा गोल अचिव्ह करताना मात्र खूप फोकस्ड राहावे लागते. ही जिद्द खेळाडूंमध्ये असते आणि त्यासाठी कमालीची चिकाटी लागते. हे मला शिकता आले, असे मोकळेपणाने प्रियंकाने सांगितले. याप्रसंगी प्रियंकाचे स्वागत लोकमतचे युनिट हेड नीलेशसिंग, लोकमत समूहाचे उपमहाव्यवस्थापक (प्रकल्प परिचालन) आशिष जैन आणि लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांनी केले.
पडून पुन्हा उठण्याची जिद्द खेळाडूंमध्ये अधिक
प्रत्येकच क्षेत्रात नव्याने स्वत:ला सिद्ध करण्याची आणि अपयशातून यशाच्या मार्गावर चालण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. पण खेळाडूंच्या आयुष्यात असे प्रसंग येतात आणि खेळाडू ही बाब अधिक चांगल्या पद्धतीने समजतो. या चित्रपटाच्या निमित्ताने विचार केला तेव्हा लक्षात आले, ही बाब आपणही आपल्या आयुष्यात नकळतपणे करीत असतो. माझ्या काही अपयशाने मी खचले पण मी त्यावर नंतर मातही केली. माझ्या क्षेत्रात मी संघर्ष केला, रडले, खचले पण आज मी उभी आहे. हे स्पोर्ट्समन स्पिरीट माझ्या वडिलांमुळे आले. सिनेमाच्या अभिनयासाठी मला पारितोषिक मिळाले नाही तेव्हा मला खूपच वाईट वाटले. पण वडिलांनी हा प्रसंग मला स्वीकारायला लावला आणि कार्यक्रमात जाऊन इतरांसाठी टाळ्या वाजविण्याचा सल्ला दिला. मी तसेच केले आणि घरी येऊन खूप रडले. पण यातूनच आपण नवी ऊर्जा मिळवित असतो, उभे राहत असतो. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीचा दम लागतो. कलेच्या क्षेत्रात वेगळी ‘स्ट्रेन्थ’ लागते. त्यामुळे परस्परांच्या क्षेत्राची तुलना न केलेलीच बरी.
१०० कोटी हे सिनेमाचे यश नाही
सिनेमाने १०० कोटी वा त्यापेक्षा जास्त पैसे कमाविले म्हणजे सिनेमा यशस्वी होतो, असे मानणाऱ्यांपैकी मी नाही. एखाद्या सिनेमाने कमी व्यवसाय केला म्हणजे तो सिनेमा कमी होत नाही. कलाकृतीच नेहमी महत्त्वाची असते, असे मी मानते. व्यवसाय हा भाग वेगळा आणि कलाकृतीचे यश वेगळे. बर्फी हा नुकताच आलेला सिनेमा अनेकांना आवडला. त्यातल्या माझ्या भूमिकेची प्रशंसा झाली आणि समाजात एक चांगलला संदेश गेला. लोक भरभरून त्या भूमिकेविषयी बोलतात तेव्हा खूप समाधान वाटते. ते १०० कोटींपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचे आहे. एका आॅटिस्टीक मुलीचे नाव तिच्या आईने झिलमिल ठेवले. अनेक आॅटिस्टीक मुलामुलींना त्यांच्या शाळेत मान्यता मिळाली आणि त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली, असे अनुभव मी ऐकते तेव्हा भूमिकेचे समाधान मिळते. त्यामुळेच १०० कोटींचे यश म्हणजे यश हे समीकरण मांडणेच चुकीचे आहे.
मिस वर्ल्ड झाल्यावर घरच्यांना ‘शॉक’ बसला
मी अत्यंत सुशिक्षित कुटुंबातून आले आहे. त्यामुळे मी चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर किंवा अभियंता व्हावे, असेच आई-बाबांना वाटत होते. गंमत म्हणूनच मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाले आणि जिंकले. त्यावेळी माझ्या घरच्या लोकांना आनंद होण्याऐवजी दु:ख झाले. सौंदर्य स्पर्धेचा तो क्राऊन मी घालून असतानाच आई मला म्हणाली, अरे पढाई कौन करेगा. तु नाम डुबायेगी हमारा. त्यानंतर मी देखील काय व्हायचे ते ठरविले नव्हते. लहानपणापासून मला नवरीसारखे सजायला खूप आवडते. घर साफ करायला आवडते. आजही माझे घर मी स्वच्छ करतेच. त्यावेळी मी आईला म्हणाले होते, मै झाडू - पोछा करनेका काम करुंगी. आईने कपाळावर हात मारून घेतला होता.
पण माझ्या आईला माझा आता अभिमान वाटतो. पण नवरी कधी होणार, असा प्रश्न केला असता तिने मला हवा तसा कुणी अजून मिळालाच नाही, असे सांगितले. माझ्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या प्रत्येकच मुलीच्या असायला हव्यात, असेही ती म्हणाली.
मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात
एकाच पठडीतल्या भूमिका करणे मला फारसे आवडत नाही. प्रत्येक भूमिकेत काहीतरी आव्हान असले पाहिजे, असे मला वाटते त्यामुळेच मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका शोधतच असते. मेरी कोम चित्रपटात काम करताना पहाडी भागात काम करताना मला त्रास झाला नाही कारण आम्ही उत्तर प्रदेशात राहत असताना सिमला, काश्मीर, नैनिताल येथे नेहमीच जात होतो.
दर दोन महिन्यांनी आमची एक ट्रीप असायची कारण वडिलांना हिल स्टेशनचे खूप वेड होते. आज राखीच्या दिवशी तुम्ही या सिनेमाच्या प्रसिद्धीचा दिवस का निवडला.
यावर ती म्हणाली, आजच वेळ मिळाला. माझा भाऊ होणे, ही सुद्धा खूप मोठी बाब आहे, हे विसरू नका. (प्रतिनिधी)
लोकमतच्या ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’ उपक्रमाला प्रतिसाद
लोकमतच्यावतीने बेटी बचाओ अभियान राबविण्यात येत आहे. लोकमतने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सुरू केलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे. लोकमतसारख्या मोठ्या वृत्तपत्राने हे कार्य हाती घेतले आणि समाजाविषयी आपली संवेदना कायम ठेवल्याबद्दल प्रियंकाने प्रशंसा केली. बेटी बचाओ अभियानाची आज समााजाला नितांत गरज आहे. मी स्वत: एक मुलगी असून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करून तिने बेटी बचाओ अभियानाच्या पोस्टरवर हस्ताक्षर करताना आनंद व्यक्त केला. लोकमतच्या या अभियानाने आपण प्रभावित झालो असल्याची प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली.

Web Title: 'Marie Com' movie inspired by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.