झेंडू फुलला, भाव वाढला
By admin | Published: October 22, 2014 10:03 PM2014-10-22T22:03:12+5:302014-10-23T00:09:35+5:30
आष्ट्यातील उत्पादकांना दिलासा : मुंबई बाजारपेठेत मागणी
आष्टा : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुलाब, जरबेरा, झेंडू, चाफा, मोगरा निशिगंध या फुलांना मोठी मागणी असून आष्टा परिसरातून मुंबई, दिल्ली, हैदराबाद बाजारपेठेत फुले पाठविण्यात येत आहेत. गेले काही दिवस या फुलांना दर कमी होता. मात्र दिवाळीत मागणी वाढल्याने फुलांचे दरही वाढू लागल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पिवळ्यापेक्षा भगव्या झेंडूला दर जादा मिळत आहे.आष्टा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा, गुलाब यांची लागवड केली आहे. कृषिभूषण बाळासाहेब ऊर्फ आप्पासाहेब चव्हाण-लाळगे यांनी अर्धा एकर गुलाब शेतीपासून सुरुवात करीत हळूहळू फूलशेती वाढविली आहे. आष्टा-दुधगाव रस्त्यावर माळरानाचे नंदनवन करीत ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा, गुलाब यांची फूलशेती वाढवीत मोगरा, झेंडू, चाफा या फुलांची शेती वाढविली आहे.त्याचप्रमाणे तानाजीराव चव्हाण लाळगे यांनीही गुलाबशेतीपासून सुरूवात करीत ग्रीन हाऊसमध्ये गुलाब, जरबेरा, चाफा यांची मोठ्या प्रमाणावर फूलशेती केली आहे. बुकेसाठी लागणारी स्पिगेरी, डी. जे. यांची लागवड केली आहे. गुणवत्ता, सचोटी व अखंड मेहनतीच्या जोरावर अहोरात्र कष्ट करीत तानाजी चव्हाण यांनी ए वन रोझ फार्म व बाळासाहेब चव्हाण यांनी कृष्णा रोझ हायटेक अॅग्री फर्मच्या माध्यमातून फूलशेतीत क्रांती केली आहे. फक्त आष्टा किंवा वाळवा तालुक्यातच नव्हे, तर राज्य व देशात आष्ट्याचे नाव फूलशेतीत आघाडीवर ठेवले आहे.
मुंबई बाजारपेठेत आष्टा येथून दररोज फुलांची निर्यात केली जात आहे. झेंडू १० टन, जरबेरा १६० ते १७० बॉक्स, गुलाब ३०० पेट्या, चाफा ३ ते ३ हजार ५०० नग, मोगरा ६० ते ७० किलो, निशिगंध २०० ते २५० किलो, अशी फुले मुंबई बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत.पिवळ्या झेंडूला ५ ते १० रुपये, तर भगव्या झेंडूस २० ते ३० रुपये दर होता. मात्र दिवाळीमध्ये मुंबई बाजारपेठेत ५० ते ६० रुपयांपर्यंत दर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जरबेरा प्रति फूल १ ते १ रुपया ५० पैसे, गुलाब ३ ते ३ रुपये ५० पैसे, चाफा दीड ते दोन रुपये, निशिगंध, मोगरा २०० ते ३०० रुपये किलो दर असून या दरात दिवाळी सणामुळे वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, सध्या फूलशेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. औषध, मजुरी खर्च वाढत आहे. कोणत्याही फुलाचे दर स्थिर नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. (वार्ताहर)
दोन महिन्यांपूर्वी झेंडूची लागवड केली. सुरुवातीस ८० ते १०० रुपये दर मिळाला. मात्र त्यानंतर ५ ते १० रुपये दर झाल्याने फुले काढून बांधावर टाकली. दिवाळीनिमित्त कालपासून ५० ते ६० रुपये किलो दर झाला आहे. हा दर ८० ते १०० रुपयांपेक्षा जास्त मिळण्याची आशा आहे.
- अमोल पाटील,
झेंडू उत्पादक
फूलशेती वाढविण्यासाठी प्रयत्न
वाळवा तालुका कृषी अधिकारी बी. आर. चव्हाण म्हणाले की, वाळवा तालुक्यात फूलशेती वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यात जरबेराचे १५ ते २० एकर, गुलाब तीन एकर क्षेत्र ग्रीन हाऊसमध्ये असून, मोगरा ५ एकर, तर झेंडूचे ५० एकरापेक्षा जास्त क्षेत्र आहे. कार्नेशिअनचीही काही प्रमाणात लागवड होत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.