झेंडू झाला मातीमोल
By admin | Published: September 20, 2016 01:26 AM2016-09-20T01:26:02+5:302016-09-20T01:26:02+5:30
उत्पादनात वाढ झाली असल्याने झेंडूला मातीमोल भाव मिळत आहे.
पुणे : उत्पादनात वाढ झाली असल्याने झेंडूला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे दररोज काही टन झेंडू शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागत असल्याचे चित्र मार्केट यार्डातील फुलबाजारात दिसू लागले आहे. सोमवारी तर सुमारे सात ते आठ टन झेंडू विक्री न झाल्याने कचऱ्यात टाकून दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सण-उत्सवांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली जाते. गणेशोत्सवामध्ये झेंडूला हमखास चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. त्यामुळे अनेक शेतकरी त्यानुसार नियोजन करीत गणेशोत्सवात झेंडू विक्रीसाठी बाजारात आणतात. या वर्षी मात्र शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. मार्केट यार्डातील फुलबाजारात येणाऱ्या झेंडूला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने झेंडूच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक होत आहे. संपूर्ण गणेशोत्सवामध्ये झेंडूला प्रतिकिलो ५ ते २० रुपये एवढा कमी भाव मिळाला.
>पितृपंधरवड्यामुळे फुलांच्या मागणीत घट
आता पितृपंधरवडा सुरू झाल्याने फुलांच्या मागणीत आणखी घट झाली आहे. परिणामी झेंडूच्या विक्रीला चांगलाच फटका बसू लागला आहे. सोमवारी तब्बल सात ते आठ टन झेंडूची विक्री न झाल्याने फेकून द्यावा लागला. फुलबाजारात दुपारी झेंडूचे ढीग लागले होते. तुलनेने काही दिवसांपासून विक्री होत नसलेल्या झेंडूचा आकडा तिपटीने कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘बाजारात सोमवारी चार गोणी झेंडू आणला होता; पण काहीच विक्री झाली नाही. त्यामुळे फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. परत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च परवडत नाही. घरीही टाकून देता येत नाही,’ असे जेजुरी परिसरातील एका शेतकऱ्याने सांगितले.