झेंडूचा बाजार फुलला...दर कोमेजला!

By Admin | Published: October 31, 2016 05:15 AM2016-10-31T05:15:26+5:302016-10-31T05:15:26+5:30

दिवाळीचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

The marigold market blossomed ... every night! | झेंडूचा बाजार फुलला...दर कोमेजला!

झेंडूचा बाजार फुलला...दर कोमेजला!

googlenewsNext


पुणे/अहमदनगर : दिवाळीचा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी झेंडूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. भगवा, पिवळा गोंड्याची आवक अचानक मोठ्या प्रमाणात झाल्याने रविवारी भाव घसरले. एरवी सणासुदीला प्रतिकिलो ६० ते ७० रुपये असा भाव खाणारा गोंडा यावेळी घाऊक बाजारात अवघ्या पाच ते दहा रुपये किलो या दराने विकला जात होता. दुपारी दोननंतर अनेक शेतकऱ्यांना गोंडा तसाच रस्त्यावर टाकून रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दिवाळीसाठी शुक्रवारपासूनच फुलांची आवक सुरू झाली. रविवारी सकाळी नगर बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून झेंडू आल्याने लिलावातच कमी दर मिळाला़ अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून फुलांची विक्री केली़ सकाळी ८ ते ११ पर्यंत ३० ते ४० रुपयांपर्यंत दर मिळाला़ दुपारी एक नंतर मात्र पाच ते दहा रुपये किलोने फुले विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून गोंड्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या तुलनेत रविवारी आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी झाली असली तरी किमान दर प्रतिकिलो पाच रुपयांपर्यंत खाली आला. बऱ्याच शेतकऱ्यांनी रस्त्यावर थांबून झेंडूची विक्री केली.
बारामती शहरातही गोंड्याला नीचांकी भाव मिळाला. सुरवातीला १५ ते २० रुपये प्रतिकिलो असणारे दर नंतर खूपच घसरले. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. काही विक्रे ते अक्षरश: हाक मारून ग्राहकांना बोलावून घेत असल्याचे चित्र दिसत होते. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखविल्याने इतर पिकांबरोबरच झेंडूची लागवडही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कृषी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवा तसेच पिवळ््या गोंड्याचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत चारपट अधिक झाले आहे. साहजिकच दर मोठ्या प्रमाणात घसरले. मुंबई, नागपूर, आदी मोठ्या शहरांतील बाजार समित्यांमध्ये मागणीपेक्षा कितीतरी जास्त गोंड्याची आवक झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>शेवंती, गुलछडीला
बरा भाव
शेवंतीलाही विशेष मागणी असल्याने भावात काहीशी वाढ झाली असून प्रतिकिलो ४० ते ७० रुपये भाव मिळाला. जरबेरा, कार्नेशियन, गुलछडी या फुलांनाही चांगली मागणी होती.
शेतकऱ्यांची घोर निराशा
दसरा व दिवाळीत लक्ष्मी पूजन तसेच पाडव्याला झेंडूची फुले वापरण्याची परंपरा आहे. यंदा दसऱ्याच्या सिझनमध्ये झेंडूला बऱ्यापैकी दर मिळाला होता़ त्यामुळे दिवाळीलाही चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र शेतात फुललेला झेंडू बाजारात कोमेजल्याने त्यांची घोर निराशा झाली.
>यंदा पाऊस चांगला झाल्याने झेंडूचे पिकही चांगले आहे़ दरवर्षीच्या तुलनेत आवक वाढल्याने भाव कमी झाला़ त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे़ दिवाळीनंतर या फुलांची विक्री होत नाही़ एक दिवसाच्या विक्रीवरच नफा आणि तोटा ठरतो़
- संतोष राशीनकर, शेतकरी

Web Title: The marigold market blossomed ... every night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.