झेंडू, शेवंतीची आवक वाढली : दिवाळीमुळे ग्राहकांकडून फुलांना मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 08:44 PM2018-11-05T20:44:38+5:302018-11-05T20:45:37+5:30
दिवाळी व त्या निमित्त करण्यात येणा-या पुजांसाठी मार्केट यार्डातील फुल बाजारात सोमवार पासून झेंडू, शेवंती या फुलांची आवक चांगलीच वाढली आहे.
पुणे : दिवाळी व त्या निमित्त करण्यात येणा-या पुजांसाठी मार्केट यार्डातील फुल बाजारात सोमवार पासून झेंडू, शेवंती या फुलांची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु सध्या राज्यासह जिल्ह्यात असलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे फुलांना पाणी कमी पडत असल्याने फुलांचा दर्जा काहीसा घसरला आहे. त्यात दोन दिवसांपासून होण-या तुरळक पावसामुळे माल अधिकच खराब झाला आहे. त्यामुळे सध्या अशा दर्जाहिन फुलांचीच जास्त आवक होत आहे. मात्र, ग्राहकांकडून चांगल्या मालाला मागणी असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री शिव छत्रपती मार्केट यार्डमध्ये सोमवार (दि.५) रोजी फुल बाजारात पुणे जिल्हासह सातारा, सोलापूर, नगर आणि मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झेंडूची आवक झाली. सुरूवातील दुष्काळाचा फटका फुलांचा पिकाला बसला आहे. पुरेशा पाण्याअभावी फुलांचा दर्जा घसरला आहे. आकाराने छोट्या फुलांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तरीही दिवाळीला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतक-यांनी माल राखून ठेवला होता. मात्र, दोन दिवसात राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राखून ठेवलेल्या मालातील भरपूर माल ओला झाला आहे. त्यामुळे मालाचा दर्जा आणखी घसरला आहे. परिणामी भाव कमी मिळत असल्याचे भोसले यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारात लाल झेंडूची अधिक आवक होत आहे. त्यास घाऊक बाजारात दजार्नुसार १० ते ५० रुपये भाव मिळत आहे.
तुलनेने पिवळ्या झेंडूची आवक कमी होत असून, त्यास घाऊक घाऊक बाजारात प्रती किलोस १० ते ९० रुपये भाव मिळाला आहे. विशेषत: मोठ्या पिवळ्या झेंडूला अधिक मागणी आहे. असा झेंडू असलेल्या शेतक-या ९० रुपये किलोने घाऊक बाजारात भाव मिळत आहे. मात्र, असा माल अत्यल्प आहे. दर्जाहिन, खराब मालाचीच अधिक आवक होत आहे. तर दुसरीकडे हार, तोरण करण्यासाठी शेवंतीला मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील यवत, माळशिरस भागातून आणि नगर जिल्ह्यातून शेवंतीची आवक होत आहे. शेवंतीला दजार्नुसार घाऊक बाजारात प्रती किलोस ५० ते १२० रुपये भाव मिळत आहे.