बांगलादेशी घुसखोरांनी बनविले उपराजधानीला माहेरघर
By admin | Published: December 19, 2014 12:42 AM2014-12-19T00:42:45+5:302014-12-19T00:42:45+5:30
उपराजधानीत माहेरघर बनविणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या महिनोगणिक वाढत आहे. मात्र या धोकादायक प्रकाराकडे पोलिसांची विशेष शाखा, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी
नागपूर : उपराजधानीत माहेरघर बनविणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या महिनोगणिक वाढत आहे. मात्र या धोकादायक प्रकाराकडे पोलिसांची विशेष शाखा, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाचे पुरते दुर्लक्ष आहे. परिणामी त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, अशी भीती खुद्द काही पोलीस अधिकारीच खासगीत व्यक्त करीत आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीत सद्यस्थितीत ५०० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर आहेत. यातील काही जण रोजमजुरी करतात तर, काही जण हातगाड्यांवर व्यवसाय करतात. काही जण मात्र काय करतात, तोच संशोधनाचा विषय आहे. कोलकाता, मालदा (प. बंगाल) या भागातून भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर शिरतात. तेथून रेल्वेच्या माध्यमाने मिळेल त्या भागात ते जातात. जेथे ‘आपली माणसं’ स्थिरावली, अशा ठिकाणी वास्तव्याला ही मंडळी प्राधान्य देतात. उपराजधानी सोयीची वाटत असल्यामुळे २००५ पासून येथे घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
दोन वर्षात २०० वर पकडले
पोलिसांनी सप्टेंबर २००६ मध्ये १०३ घुसखोरांना नागपुरात पकडले. त्यांची नंतर भारतातून हकालपट्टी करण्यात आली. या घटनेच्या काही दिवसानंतर पुन्हा नागपूर आणि गोंदियात ८० बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आले. २४ डिसेंबर २००७ मध्ये ३४ बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आले. तर, जानेवारी २००८ मध्ये पुन्हा अशाच प्रकारे काही घुसखोरांना अटक करण्यात आली. या कारवायांचा धसका घेऊन बांगलादेशी घुसखोरांनी नागपुरातून पलायन सुरू केले. मात्र, २०१० पासून त्यांनी पुन्हा नागपुरात आश्रय घेणे सुरू केले आहे. अलिकडे घुसखोरांच्या नागपुरातील वास्तव्याचा आकडा चांगलाच फुगू लागला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि विशेष शाखा (एसबी) तसेच एटीएसचे त्याकडे पुरते दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. या संदर्भात संपर्क केला असता अधिकारी बोलायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या विशेष शाखेकडे याबाबत कसलीही माहिती नाही. गेल्या वर्षी दोन घुसखोरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे येथील अधिकारी सांगतात. गेल्या आठवड्यात प्रशासनालाही त्यांच्याकडून अशीच (दोन घुसखोरांची) माहिती देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे बांगलादेशी घुसखोराच्या मुद्यावर तपास यंत्रणा किती गांभिर्याने लक्ष ठेवून आहेत, त्याची प्रचिती येते. (प्रतिनिधी)
अर्थव्यवस्थेलाही धोका
बांगलादेशी घुसखोर भारताची चलन व्यवस्था खिळखिळी करण्यात महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत ५०० आणि १००० च्या लाखोंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांपैकी बहुतांश आरोपी प. बंगालच्या सीमेनजीकचे (कोलकाता, मालदा जिल्ह्यातील) रहिवासी आहेत. सीमेपलीकडून या नोटा आणल्याची त्यांनी पोलिसांकडे कबुलीही दिली आहे. तरीसुद्धा घुसखोरांची माहिती ठेवून त्यांना अटकाव करण्यात तपास यंत्रणा स्वारस्य दाखवत नाही.