मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 11:09 IST2024-12-08T11:08:12+5:302024-12-08T11:09:47+5:30

माझ्या आमदारकीपेक्षा हा मारकडवाडीला लढा महत्त्वाचा आहे, आमदारकी लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट नाही असं जानकरांनी सांगितले. 

Markadwadi EVM Agitation: I resign, vote on the ballot; The MLA Uttamrao Jankar gave a challenge to Election Commission infront of Sharad Pawar | मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

मारकडवाडी - बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. देशातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास अडचण काय असा सवाल करत आमदार उत्तमराव जानकर यांनी मारकडवाडीत शरद पवारांसमोर ईव्हीएम घोळावरून सरकारला चॅलेंज दिले.

आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा, हे माध्यमांत सांगण्यापुरते नाही. मी खरोखर राजीनामा देतोय, इथली जी परिस्थिती आहे ती लोकांना मान्य नाही. मारकडवाडीत असं मतदान होऊ शकत नाही. १४०० लोकांनी मला प्रतिज्ञापत्र करून द्यावे. सगळ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीतील ठराव माझ्याकडे आले आहे. मारकडवाडीतील १४०० लोकांनी ज्यांनी मला मतदान केलंय परंतु मला ८०० मते दाखवण्यात आलीत. समोरच्याला १ हजार मते दाखवली आहेत. गावातील ५०० मतदान विरोधकाला झाले आहे परंतु ज्या १४०० लोकांनी मला मतदान केले त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहोत. तालुक्यातील ९१ गावातील ठराव घेऊन निवडणूक आयोगाला अर्ज करणार आहे. आमची शंका दूर करण्यासाठी तुम्हाला बॅलेट मतदान घ्यावे लागेल. लाडक्या बहिणीचा परिणाम झालाय पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. लोकशाही वाचवायची असेल तर ती शरद पवार वाचवू शकतात. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या अटीवर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. देशातील एक निवडणूक बॅलेटवर घेण्यास निवडणूक आयोगाला अडचण काय? निवडणूक आयोगाने ऐकले नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जावू. हा लढा उभा करू असं त्यांनी सांगितले.

तसेच मारकडवाडीत मतमोजणीवेळी आमच्या मतदान प्रतिनिधींनी बहिष्कार टाकला, काहीतरी गडबड झालीय असं मला सांगण्यात आले. पश्चिम भागातून प्रत्येक फेरीत मी २ हजार मतांनी मागे चाललोय त्यामुळे मीदेखील चकीत झालो. आम्ही तातडीने VVPAT मोजा असा अर्ज दिला परंतु निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले. निकालानंतर तालुक्यातील प्रत्येक घरातील लोक मला येऊन भेटले, सगळ्यांचा आक्रोश हाच आहे आम्ही तुम्हाला मतदान दिले ते गेले कुठे? मग याला मार्ग काय, मारकडवाडीतील गावकरी सलग ३ दिवस माझ्याकडे येत होते. आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही. आम्हाला आजूबाजूच्या गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही असं ते सांगत होते. यामागे कारण होतं की, २०१९ च्या निवडणुकीत या तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांची टक्केवारीत दिली, या गावाने १०४३ मतांचे लीड मला दिले. त्यावेळी मोहिते पाटील आणि मीसोबत नव्हतो. मग आता एकत्र असताना अशी मतमोजणी झाली कशी हा प्रश्न पडला असं आमदार जानकरांनी म्हटलं.

त्याशिवाय मारकडवाडीतील लोकांनी स्वखर्चाने मतदान घेण्याचं ठरवलं. मीडियातून हे सर्व लाईव्ह झाले. ज्यावेळी तारीख जाहीर केली. इथं गावात बोर्ड लावले त्यावर तुमच्या आई वडिलांना स्मरून तुम्ही इथं मत देताना ज्याला मतदान केले त्यालाच मत द्यायचे असं लिहिलं होते. १२ उमेदवारांनी हजर राहावे यासाठी गावकऱ्यांनी फोन केले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मतदानाच्या आदल्या रात्री मला फोन आला, पोलिसांनी मतदानासाठी मंडप काढून टाकायला सांगितले, सर्व आटोपायला सांगितले. त्यारात्री मी इथं गावात मुक्काम केला. अख्खं गाव इथं होते, कुणीही गावातील घरी जेवायला गेले नाही. दुसऱ्या दिवशी याचा उद्रेक झाला. पोलीस आले, मीडियाचे प्रतिनिधी आले, सीआरपीएफच्या ३ तुकड्या आणि ८० पोलीस होते. गावात मतदान होऊ दिले नाही असा आरोप जानकरांनी केला. 

दरम्यान, मारकडवाडीची लढाऊ माती मी ६ डिसेंबरला चैत्यभूमीला घेऊन गेलो. तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाशी अर्पण केली. हे परिवर्तन क्रांतीचे स्वप्न ज्यांनी संविधानाचे आणि लोकशाहीचे रक्षण केले तिथे माती नेली. तिथून ५ मेणबत्ती घेऊन इथं आलो, या ५ मेणबत्या शरद पवारांच्या हाताने पेटवून हा अंध:कार दूर  करून प्रकाशमान करायचा आहे. माझ्या आमदारकीपेक्षा हा मारकडवाडीला लढा महत्त्वाचा आहे. अनेक लोक बळी गेले असतील. अनेक लोकांचे नुकसान झाले असेल परंतु मी संघर्षातला माणूस आहे. माझी आमदारकी लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट नाही असं आमदार उत्तमराव जानकर म्हणाले. 

Web Title: Markadwadi EVM Agitation: I resign, vote on the ballot; The MLA Uttamrao Jankar gave a challenge to Election Commission infront of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.