बाजार समिती बंद मुळे नाशिकमध्ये साडेतीनशे कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Published: July 4, 2016 07:55 PM2016-07-04T19:55:16+5:302016-07-04T19:55:16+5:30
भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमुळे जिल्ह्यातील १९ बाजार समित्यांचे सुमारे ३०० ते ३५० कोटींचे
ऑनलाइन लोकमत
नाशिक , दि. ४ : भाजीपाला आणि फळे नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमुळे जिल्ह्यातील १९ बाजार समित्यांचे सुमारे ३०० ते ३५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. एकट्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ४० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली.
दरम्यान, बाजार समित्या बंद असल्यामुळे सोमवारी (दि.४) बाजारात आलेल्या शेतमाल व भाजीपाला व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर बाजार समितीत काम करणाऱ्या माथाडी कामगार व रोजंंदारीवरील कर्मचाऱ्यांची उपासमार झाल्याचे चित्र होते.
राज्य शासनाने नुकताच भाजीपाला व फळे नियमनमुक्तीच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्याविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी (दि.४) एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील १९ बाजार समित्या व उपबाजार यांच्यातील व्यवहार ठप्प झाले. नाशिक जिल्ह्यास लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा, तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येत असतो. एकट्या नाशिक बाजार समितीत दररोज किमान एक हजार वाहने दिवसभरात टमाटे, फ्लॉवर, कोथिंबीर, कोबी, सीमला मिरची यांसह विविध भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. सोमवारी लाक्षणिक बंद असल्याने बाजार समितीत शुकशुकाट जाणवत होता. किरकोळ स्वरूपात काही शेतकऱ्यांनी कारले विक्रीसाठी आणले होते. कारल्याचे २० किलो जाळीस १००० ते १२०० भाव असताना
सोमवार बंदच्या काळात याच कारल्यांच्या जाळीचा भाव २५० ते ३०० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे बाजार समिती बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांतील दररोजचे व्यवहार पाहता किमान ३०० ते ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
४० कोटींचा व्यवहार ठप्प
नाशिक बाजार समितीत दररोज सर्व प्रकारचा भाजीपाला व पालेभाज्या विक्रीसाठी येत असतात. दररोज किमान एक हजार वाहनांद्वारे ही वाहतूक केली जाते. नाशिक बाजार समितीला दररोज दिवसाकाठी झालेल्या व्यवहारापोटी किमान चार लाखांचे उत्पन्न मिळते. तसेच दिवसाला किमान ४० कोटींची उलाढाल बाजार समितीतील व्यवहारातून होते. सोमवारी बंदमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली.
- देवीदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक