मराठवाडा विद्यापीठात चालतोय ‘पीएच.डी’चा बाजार

By admin | Published: March 3, 2016 04:38 AM2016-03-03T04:38:25+5:302016-03-03T04:38:25+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी मिळविण्यासाठी चालणाऱ्या बाजाराची धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत

The market of Ph.D. runs at Marathwada University | मराठवाडा विद्यापीठात चालतोय ‘पीएच.डी’चा बाजार

मराठवाडा विद्यापीठात चालतोय ‘पीएच.डी’चा बाजार

Next

नजीर शेख,  औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी मिळविण्यासाठी चालणाऱ्या बाजाराची धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. मार्गदर्शकाला ठरावीक रक्कम न दिल्यास किंवा त्याची सूचना न पाळल्यास विद्यार्थ्याचा छळ केला जात असल्याचा अनुभव साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी वीरा राठोड यांनाही आला आहे.
पीएच.डीसाठी दीड लाख रुपयांची मागणी एका महिला मार्गदर्शकाने केल्याचे नुकतेच समोर आले आहे. वीरा राठोड यांनी सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या मराठी विभागात डॉ. अशोक देशमाने यांच्याकडे पीएच.डीसाठी नोंदणी केली होती. प्रबंध पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी राठोड यांची अडवणूक करण्यात आली. यासंबंधी राठोड म्हणाले, मी ‘आत्माराम कणिराम राठोड यांच्या साहित्याचा अभ्यास’ हा विषय संशोधनासाठी घेतला होता. त्यावेळी दोन बाह्य परीक्षकांना बोलावण्यासाठी देशमाने यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. बाह्य परीक्षकांना पाकिटे (प्रत्येकी २५ हजाराचे एक) द्यावी लागतात. राहण्याचा आणि वाहनाचा सुमारे एक लाख रुपये खर्च सांगण्यात करावा लागतो, असे सांगण्यात आले. मी ही रक्कम देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे लेखी परीक्षा होते किंवा नाही, असे मला वाटू लागले. मी तत्कालीन कुलगुरूडॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडे तक्रार केली. मुलाखत प्रक्रिया झाली. मार्गदर्शकाने माझे खच्चीकरण होईल, अशीच वर्तणूक केली. त्यामुळे पीएच.डीच्या विद्यार्थ्यांची कशी छळवणूक होते, याचा प्रत्यय मला आला. वास्तव जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने डॉ. देशमाने यांच्याशी संपर्क करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. त्यांनी ‘नंतर फोन करतो’ असे सांगितले. मात्र, फोन केला नाही.
पीएच.डीचा बाजार समोर आणणारी आणखी एका ‘आॅडिओ क्लिप’ ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील एका महिला मार्गदर्शकाविरुद्ध विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे लेखी तक्रार आणि सोबत ‘आॅडिओ क्लिप’ सादर केली आहे. त्या ‘आॅडिओ क्लिप’ मधील काही अंश...
विद्यार्थी : मॅडम, मी आलो होतो डिपार्टमेंटला.
गाईड : पण मी निघाले; डिपार्टमेंटमधून ना.
विद्यार्थी : अरे बा.. मग आता भेट..
गाईड : सांगितले ना मघाशी. मला नितीनने काहीच सांगितले नाही. सहा महिने झाले. बस आता रखडत.
विद्यार्थी : नाही मॅडम, मी कॉलेजलाच होतो.
गाईड : हो, मी उशिरा येणार होते. माझ्या घरचं काम झालं नाही. माझ्या घरची मोटार जळाली.
विद्यार्थी : सर म्हणाले, थोडे उशिरा येणार आहेत त्या...
गाईड : आता तू घरी आलास तर मोटारचे काम चालू असल्याचे दिसेल.
विद्यार्थी : मी घेऊन येऊ का कॉपी, तुमच्या घरी.
गाईड : चेक घेऊन येणार असशील तर आणि बाकी डिटेल घेऊन येणार असशील तर ये.
विद्यार्थी : चेक मिळून जाईल ना; परवा करूचेकचे काम.
गाईड : नाही नाही. चेक ‘क्लीअर’ होईल तेव्हाच मी सही करीन.
विद्यार्थी : मॅडम उशीर होईल खूप मला.
गाईड : तुला किती दिवसांपासून सांगत आहे. मी काय तुझ्याकडे भीक मागत आहे का?
विद्यार्थी : नाही हो नाही...
( हा संवाद, आॅगस्ट २०१५ मधील असून, या विद्यार्थ्याला अजून पीएच. डी मिळालेली नाही.)

Web Title: The market of Ph.D. runs at Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.