बाजारपेठांचे शटर डाउन
By admin | Published: June 6, 2017 01:33 AM2017-06-06T01:33:35+5:302017-06-06T01:33:35+5:30
शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागासह, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागासह, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. तेराही तालुक्यात हा बंद पाळण्यात आला. शेतकऱ्यांच्या हाकेला व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आजही शेतकऱ्यांनी काही ठिकाणी शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला. मात्र हे प्रमाण कमी होते. दूधसंकलन बंद ठेवले. काही ठिकाणी दुधाचे टँकर अडवून ठेवले, मात्र त्याचे नुकसान केले नाही.
रविवारी सर्वच तालुक्यांत शेतकऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज दूध संकलनासह बाजारातील किरकोळ दुकानांचे शटर व्यापाऱ्यांनी उघडलेच नाही. काही ठिकाणी दुकाने उघडली गेली. मात्र शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर ती बंद करण्यात आली.
विशेष म्हणजे काही ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी एक दिवस आमचे नुकसान झाले तरी चालेल. पण ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर आमचा धंदा सुरू आहे, त्यांच्यासाठी एक दिवस असे म्हणत ते बंदमध्ये सहभागी झाले. सोमवारीही काही ठिकाणचे आठवडेबाजार होते, मात्र तेही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. गावोगावी शेतकऱ्यांनी जमून रास्ता रोको केले. शेतकऱ्यांना हव्या असलेल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या, तसेच या सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला़ याला अपवाद फक्त भोर शहर ठरले. येथील शटर मात्र आज उघडेच होते. दिवसभर सर्व व्यवहार नियमीत सुरू होते.
बारामती, इंदापूर तालुक्यात सर्वच बाजारपेठा बंद होत्या. जेजुरी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. शहरातील सर्व दुकाने-उपाहारगृहे बंद असल्यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मात्र हाल झाले.
दौैंड शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला. विशेष म्हणजे येथील कुरकुंभ औद्योगिकनगरीतदेखील व्यावसायिकांनी
बंद पाळला.