‘त्या’ जागेचे बाजारमूल्य १५० कोटी!

By admin | Published: May 19, 2016 05:47 AM2016-05-19T05:47:19+5:302016-05-19T05:47:19+5:30

३७ एकर भूखंडाची किंमत बाजारभावाने सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे.

The market value of 'that' space is 150 crore! | ‘त्या’ जागेचे बाजारमूल्य १५० कोटी!

‘त्या’ जागेचे बाजारमूल्य १५० कोटी!

Next

मुरलीधर भवार,

कल्याण- महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा निकटवर्ती गजानन पाटील याने ज्या भूखंडाच्या व्यवहारासाठी ३० कोटींची लाच मागितली, त्या नांदिवली (ता. कल्याण) येथील ३७ एकर भूखंडाची किंमत बाजारभावाने सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. ५ कोटींच्या जागेसाठी ३० कोटींची लाच कोणी मागेल का, असा दावा मंत्री खडसे यांनी केला होता.
डॉ. बाबासाहेब शैक्षणिक संकुलासाठी डॉ. रमेश जाधव यांच्या संस्थेला आधी कल्याण तालुक्यातील निळजे या गावातील जागा मंजूर झाली होती, पण ती जागा गुरचरण असल्याने त्यांना मिळाली नाही. नंतर मिळालेली जमीन नांदिवली (ता. कल्याण) येथील आहे. तीच सध्या महसूलमंत्री खडसे यांच्या निकटवर्तीयाच्या लाच प्रकरणामळे चर्चेत आहे. नांदिवली गाव कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाल्याने हा परिसर शीघ्रगतिने विकसीत होत असल्याने जागेच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ‘त्या’३७ एकर भूखंडाची बाजारमूल्यानुसार किंमत १५० कोटींच्या घरात असल्याचे तेथे नुकत्याच झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारातून दिसून येते. रेडीरेकनरनुसार या जागेची किंमत ७७ लाख ४० हजार रुपये इतकीच आहे.
१९९५ साली डॉ. जाधव यांनी मित्रांसोबत इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स इन प्रोजेक्टस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकूल उभारणार आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना २००९ मध्ये निळजे येथे २८ एकर जागा देऊ केली होती. मात्र, नंतर ही जमीन गुरचरण असल्याचे कारण देत सरकारकडून ती जागा नाकारण्यात आली.
त्यानंतर संस्थेने पुन्हा
नव्याने जागेची मागणी केली. सरकारने अंबरनाथ तालुक्यातील नांदिवली गावात ३७ एकर पर्यायी जागा दिली. पण, मंत्रालयाला लागलेल्या आगीत संस्थेच्या प्रस्तावाची फाईल जळून खाक झाली. त्यामुळे पुन्हा रेकॉर्ड तयार करावे लागले. नगरविकास खाते, महसूल यांच्याकडे पाठपुरावा सुरू झाला. नांदिवलीच्या जागेसाठी जाधव यांच्या संस्थेने ७४ लाखाची रक्कम सरकारदरबारी भरली. ही प्रक्रिया सुरु असताना परिवहन आयुक्त आणि एमएमआरडीए यांनी सदर संस्थेला दिलेली जागा ट्रान्स्पोर्ट हबसाठी देऊन टाकली. सदर प्रकरण मंत्रालयात प्रलंबित असल्याने त्यासाठीच गजानन पाटील याने ३० कोटीची लाच डॉ. जाधव यांच्याकडे मागितली आहे.
गजाजन पाटीलचे जेजे कनेक्शन
लाचखोरीप्रकरणी अटकेत असलेला गजानन पाटील हा जे.जे. हॉस्पिटलमधील एका डॉक्टरच्या क्वार्टरमध्ये अनेकदा मुक्कामी असायचा. मंत्रालयात कामे घेऊन येणाऱ्यांना तो त्या ठिकाणी बोलवायचा अशी माहिती आहे. या डॉक्टरची त्याला नेहमी साथ असायची. भाजपाच्या एका राज्यमंत्र्यांचा पीए आणि चालकाशीही त्याचे खास गुळपीठ होते, असे समजते.
एसीबीकडे तक्रार
लाचखोरीच्या प्रकरणातील तक्रारकर्ते डॉ.आर.के.जाधव यांनी आपणास धमक्या मिळत असल्याची तक्रार आज एसीबीकडे केली. महसूलमंत्री खडसे ज्या पद्धतीने बोलत आहेत; ती बघता त्यातून
धमक्यांचे संकेत मिळतात, असा दावा त्यांनी केला आहे. जमिनीच्या प्रकरणाचा निवाडा देताना तारखांची फेरफार करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा संगणकीय डाटा
एसीबीने ताब्यात घ्यावा, अशी मागणीही जाधव यांनी केली
आहे. (प्रतिनिधी)

प्रदेश काँग्रेसचा हल्लाबोल
नांदिवलीच्या जागेची किंमत साडेपाच कोटी रुपये असताना गजानन पाटील ३० कोटी रुपयांची लाच मागेलच कसा, असे महसूल मंत्री खडसे यांचे म्हणणे असले तरी बाजार मूल्यानुसार या जागेची किंमत २०० कोटी रुपायांच्या घरात असल्याचा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला. ते म्हणाले की, खडसे सांगतात त्यापेक्षा कितीतरी जास्त रेडिरेकनरचेच दर आहेत. बाजारभाव तर आणखीच जास्त आहेत.

आठ महिने होते लक्ष

विरोधी पक्षनेते असतानाच खडसे यांनी डिसेंबर २०१२ मध्ये निळजे येथील जागा जाधव यांच्या संस्थेला देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांना हे प्रकरण अगोदरपासूनच माहीत होते.
जमिनीचा व्यवहार मार्गी लावण्याचा विषय मंत्रालयात गेल्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यासाठी सुरुवातीला १५ कोटींची लाच मागितली गेली. तेव्हापासून म्हणजे साधारण ८ महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खाते या व्यवहारावर लक्ष ठेवून होते.

Web Title: The market value of 'that' space is 150 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.