बाजारपेठा गजबजणार; राज्यात निर्बंध शिथिल; वाचा काय सुरु राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:59 AM2020-06-05T05:59:46+5:302020-06-05T06:00:07+5:30
पुनश्च हरिओम : लॉकडाऊनला टप्प्याटप्प्याने बाय बाय !
विशेष प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आले असून मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता बाजारपेठेतील दुकाने ५ जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेली अडीच महिने ठप्प असलेली बाजारपेठ पुन्हा गजबजणार असून ग्राहकांसह व्यापारी व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल.
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवत मिशन बिगीन अगेन म्हणजेच ‘पुनश्च हरिओम’चा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने गुरुवारी नियमावलीत काही सुधारणा केल्या. आता मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील महापालिका आणि पालिकाक्षेत्रादरम्यान (एमएमआर) प्रवासासाठी निर्बंध उठविण्यात आले आहेत. याआधी फक्त अत्यावश्यक सेवा तसेच तातडीच्या पाससह प्रवास करण्यासच परवानगी होती.
मुंबईसह रेड झोनमधील १९ महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये खासगी कार्यालये ८ जूनपासून दहा टक्के किंवा दहा यापैकी जी संख्या जास्त असेल तेवढ्या उपस्थितीने सुरू करता येतील. उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय राहील. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविण्याव्यतिरिक्तची कामे सुरू करता येतील. आॅनलाईन शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी तसेच निकाल जाहीर करणे या कामांचा त्यात समावेश आहे.
दुकानांसाठी
सम-विषम नियम
सर्व प्रकारची दुकाने ५ जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी सम-विषम असे सूत्र असेल. सम तारखेला रस्त्याच्या एका बाजूची दुकाने उघडी राहतील तर विषम तारखेला त्याच्या समोरच्या बाजूची दुकाने उघडी राहणार आहेत. दुकानात गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यायची आहे. शक्य असेल तिथे होम डिलिव्हरीचा पर्याय राहील.
रविवारपासून
वृत्तपत्रे घरपोच
सर्वत्र येत्या रविवारपासून (७ जून) वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरुणांची काळजी घेणे आवश्यक असून त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
काय सुरू होणार?
उद्यानात जाता येणार. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करता येणार, मात्र कोणत्याही ग्रुप अॅक्टिव्हिटीला परवानगी नाही. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा. गॅरेज, वर्कशॉप सुरू होणार.
03 जूनपासूनच हे सर्व सुरू करण्यात आले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी जसे उद्याने जीम येथे गेल्यास तेथील साधनांचा वापर करता येणार नाही.