अन्नदात्यासाठी बाजार कडकडीत बंद, बाजार समित्या ठप्प, पुण्यात मोर्चाला अटकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 07:22 AM2020-12-09T07:22:00+5:302020-12-09T07:22:23+5:30
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ अपवाद वगळता राज्यात सर्वत्र बंद शांततेत पार पडला. राज्यभरातील बाजार समित्या बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार दिवसभर बंद होते. अनेक ठिकाणी निदर्शने काढून जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. काही ठिकाणी कृषी विधेयकाची होळी करण्यात आली.
सोलापुरात लाठीमार
पुणे/कोल्हापूर/सोलापूर : ‘भारत बंद’ला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोल्हापुरात शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी विधेयकाची होळी केली, तर सोलापुरात आंदोलकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पुण्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वगळता या बंदमध्ये जनता सहभागी झाल्याचे चित्र दिसले नाही. महाआघाडीतील पक्षांनी आयोजित केलेला ‘टिळक चौक ते मंडईतील टिळक पुतळा’ हा मोर्चा टिळक चौकातच अडवण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी चौकातच ठिय्या देत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात तब्बल २० राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. सांगली जिल्ह्यात कडकडीत तर ग्रामीण भागात संमिश्र बंद पाळण्यात आला. सांगली शहरात काढण्यात आलेली आवाहन रॅली पोलिसांनी अडवल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. साताऱ्यात निदर्शने करत रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आठ जण जखमी
सोलापुरात बंददरम्यान मोर्चा काढणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत वाद झाला.
पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात आठ जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी ‘लोकमत’ला दिली.
शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयामध्ये दिवसभर डांबून ठेवण्यात आले. दुपारी चौकशीनंतर कार्यकर्त्यांची सुटका झाली.
मालवाहतूक ठप्प
नाशिक : ‘भारत बंद’ला उत्तर महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिकमध्ये बाजार समिती, मालवाहतूक पूर्णपणे ठप्प होती. शहर बससेवा बंद होती. मात्र, बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बस, रेल्वेसेवा सुरळीत सुरू होत्या. दरम्यान, बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विरोधकांनी काढलेल्या आवाहन फेरीला पोलिसांनी आक्षेप घेतल्याने शालिमार चौकात काही काळ तणाव निर्माण झाला.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.
धुळ्यातही संमिश्र प्रतिसाद मिळाला. धुळे-मुंबई आणि नागपूर-सूरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नगर जिल्ह्यातही बाजार समित्या बंद होत्या. अकोले, शेवगाव येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकरी संपाने चर्चेत आलेल्या पुणतांबा (ता. श्रीरामपूर) येथेही गाव बंद ठेवण्यात आले. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
बंदला मिळाले सचखंड गुरुद्वाराचे बळ
औरंगाबाद : भारत बंदला संपूर्ण मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र बाजारपेठा बंद होत्या. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून दिल्लीतील आंदोलकांसाठी लंगर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने मंगळवारी अन्नधान्य आणि औषधींचा साठा पाठविण्यात आला. सोबत ५० जणांचे पथकही दिल्लीकडे रवाना झाले.
औरंगाबादमध्ये बाजार समिती आणि धान्य बाजारात कडकडीत बंद होता. शहरातील दुकाने चालू होती. औद्योगिक क्षेत्रावर बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. काँग्रेस व डाव्या पक्षांनी दिल्लीगेटवर रास्ता रोको केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आंदोलकांनी पोलीस ठाण्यातच सभा घेतली. शहरातील प्रत्येक चौकाला पोलीस छावणीचे रूप आले होते. शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला असला तरी सेना रस्त्यावर उतरली नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला. तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, भूम, परंडा, कळंब या शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठाही बंद होत्या. जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प होते. जालना शहरातही बियाणे आणि खत विक्रेत्यांची दुकाने बंद होती.
बीड जिल्ह्यासह शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर सर्व व्यवहार सुरू झाले होते.
हिंगोलीत वकील संघानेही बंदमध्ये सहभाग घेतला. कळमनुरीत शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा, या मागणीचे निवेदन वकील संघाच्या वतीने नायब तहसीलदार सतीश पाठक यांना देण्यात आले. परभणीत वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपुलावर रास्ता रोको केले. यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती.
ग्रामीणमध्ये उत्स्फूर्त, मलकापूरमध्ये रेल्वे अडविली
नागपूर/अकोला : ‘भारत बंद’ला विदर्भातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त तर शहरी भागांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरात बंद शांततेत पार पडला. सर्व बाजारपेठा सुरू होत्या. तसेच दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू असल्याने शहरात बंदचा फारसा प्रभाव दिसला नाही. जिल्ह्यात मात्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी कोराडी नाका चौकात रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. अमरावती जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती.
वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चा व रास्तारोको करून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरात रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. गडचिरोलीत शहरी भागातील बाजारपेठ कडकडीत बंद हाेती. गोंदिया, भंडारा जिल्ह्यातदेखील संमिश्र प्रतिसादाचे चित्र होते.
पश्चिम वऱ्हाडात स्वाभिमानी रस्त्यावर
बंदला पश्चिम वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे सकाळी रेल्वे अडवून बंदला प्रारंभ केला. त्यामुळे रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.