राख्यांनी बाजारपेठ फुलली; ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यावसायिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:15 PM2023-08-29T17:15:39+5:302023-08-29T17:17:05+5:30
दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात राख्या घेण्यासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी होत असते.
भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरात राखीचे दुकाने थाटली असून मात्र ग्राहक ऑनलाईन खरेदी ला जास्त प्राधान्य देत असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे.
दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात राख्या घेण्यासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी होत असते. मात्र, ऑनलाईन पध्दतीने राख्यांची खरेदी जास्त होत असल्याने बाजारात ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत राख्यांवर आपली उपजीविका भागवणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांवर संकट कोसळले असून त्यामूळे दुकानदार हतबल झाले असल्याचे दिसून येतं आहे. त्यामुळे राखी विक्रेत्यांनी आणलेले माल विक्री करायचा कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने बाजारातील वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे व्यापार करणे कठीण झाले आहे.
छोट्या मोठ्या खेडेगावापासून लहान लहान शहरांपर्यंत अनेक ठिकाणी व्यापारी राखी पौर्णिमेच्या काही दिवसा अगोदर राख्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी लागत असतात. त्यामध्ये काही महिलांच्या संस्थेच्या वतीने तर मूकबधिर मुलांकडून तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून सुद्धा बाजारात राख्या विक्रीसाठी आणलेले असतात. मात्र, यावर्षी राख्यांची ऑनलाइन खरेदी वाढली असून लोकांनी ऑनलाईन पद्धतीने राख्या घेण्याचा कल नागरिकांचा वाढला आहे. त्यातूनच ऑनलाईन राखी घेताना त्यासोबत मिळणाऱ्या निरनिराळ्या गिफ्ट करिता ग्राहक सुद्धा आकर्षित होतात व साहजिकपणे याचा फटका खेडेगावात व शहरी भागातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना बसतो. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी राख्यांच्या किमतीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे सुद्धा नागरिकांनी राख्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.