बाजारपेठा ठप्प

By Admin | Published: June 3, 2017 02:01 AM2017-06-03T02:01:11+5:302017-06-03T02:01:11+5:30

शेतकरी संपाला शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलनामुळे बाजारपेठातील व्यवहार

Markets jam | बाजारपेठा ठप्प

बाजारपेठा ठप्प

googlenewsNext

शेतकरी संपाला शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलनामुळे बाजारपेठातील व्यवहार रखडले होते. शेतकऱ्यांंनी एकमेकांना आवाहन करत बाजारात माल विक्रीसाठी येऊ दिला नाही. व्यवहार रखडल्याने अनेक बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी आठवडेबाजार भरलेच नाही. रस्त्यावर दूध ओतत तसेच भाजीपाला रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध करण्याचे सत्र दुसऱ्या दिवशीही पाहयाला मिळाले. पुणे-नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको केल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुपे येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते. तुरळक तणाव वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आंदोलन पार पडले. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.

बारामतीत भाज्यांचे दर कडाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती तालुक्यात शेतक-यांनी संपाला उत्स्फूर्त पाठींबा देत सर्व व्यवहार बंद ठेवले. बाजारात शुक्रवारी आवक न झाल्याने चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. संपाला श्री गणेश भाजी मंडई किरकोळ भाजी विक्रेत्यांचा पुर्णपणे पाठंीबा आहे. व्यापाऱ्यांना शेतकरी माल देत नाही, तोपर्यंत मंडई पुर्णपणे बंद राहणार आहे, श्री गणेश भाजी मंडई संघटनेचे अध्यक्ष चिऊशेठ जंजिरे यांनी सांगितले. आंबाविक्रेत्यांकडे ३० हजार रुपयांचे आंबे शिल्लक आहेत. त्यांची विक्री सुरुच राहणार आहे. शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्यात आली आहे. मात्र,शिल्लक माल विक्रीच्या नावाखाली काही ठीकाणी भाजीविक़्री तिप्पट दराने सुरु असल्याचे दिसुन आले. यामध्ये भेंडी,वांगे, गवार चक्क ८० रुपये प्रति दराने विक्री सुरु होती. तर मिरची,फ्लॉवर ६० रुपये प्रतिकीलो दराने विक्री सुरु होती. मंडई बंद असल्याने या ठीकाणी शुकशुकाट होता.चढ्या दराने देखील भाजी खरेदी करणारे ग्राहक यावेळी बाजारात आढळले.


बारामती-इंदापूर रस्त्यावर दुधाचे पाट

दरम्यान, इंदापुर तालुक्यात सणसर - भवानीनगर मध्ये शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यानी बारामती-इंदापूर रस्त्यावर दूध ओतुन संपाला पाठींबा दिला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता दुसऱ्या दिवशी या परीसरात कायम आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार लिटर दूध बारामती-इंदापूर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी ओतून दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेती मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी सणसरचे उपसरपंच अभयसिंह निंबाळकर म्हणाले शेतकऱ्याच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सणसरचा रविवारी होणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी सणसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, सपकळवाडीचे सरपंच शिवाजी सपकळ, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, विनोद सपकळ, अमोल भोईटे,शशी निंबाळकर, दत्तात्रय सपकळ, योगेश माने, सुरेश खोपडे, राहुल चव्हाण, ऋषी निंबाळकर, प्रविण ननवरे, संतोष कांबळे, गणेश मोरे, अभि चव्हाण, गणेश घाडगे, नानासाहेब चव्हाण, प्रविण घोरपडे, जावेद शेख व शेतकरी उपस्थित होते.

बाजाराकडे व्यापाऱ्यांची पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : शेतकरी संपावर जाण्याच्या शुक्रवारी दुसऱ्या दिवशी यवतच्या आठवडे बाजारात शुकशुकाट होता. बाजारात शेती माल आला नसल्याने भाजी मंडई बंद राहाण्या बरोबरच इतर मालाचे किरोकोळ विक्रेते देखील बाजाराकडे फिरकले नाहीत.
दौड़ तालुक्यातील मोठा आठवडे बाजार अशी ख्याती असलेल्या यवतच्या बाजारात बैल बाजार व शेळ्या मेंढ्यांचा बाजार देखील भरत असतो. मात्र, शुक्रवारी बैल बाजार व शेळ्या मेंढ्यांचा बाजार देखील बंद होता. शेतमाल विक्रीसाठी काही मोजकेच आलेले व्यापारी व शेतकरी आज बाजार बंद असल्याने तातडीने निघून गेले. शेतकरी संघटनेचे खंडू दोरगे व इतर आज सकाळी ११ वाजेपर्यंत बाजार मैदानात थांबून होते. मात्र बाजारात पुर्णत: बंद पळला गेल्याने शेतकरी संप पूर्णपणे यशस्वी होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी
खंडू दोरगे यांनी दिली. बाजारात आज शेतीमाल आला नसल्याने कालच्या आंदोलनात रस्त्यावर भाजी पाला फेकण्याची वेळ आली नव्हती. आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांना आठवडाभराचा भाजी पाला मिळाला नाही.

पुणे- सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता.दौड़) टोल नाक्यावर कालच्या तीव्र आंदोलनानंतर आज मात्र शुकशुकाट होता. काल दुपार नंतर पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेऊन इतर ५० आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आज आंदोलन करते गायब होते. काल अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायलायाने जामीन मंजूर केला. मात्र, आणखी आरोपी घटनास्थळावरील चित्र पाहून अटक केले जाणार असल्याचे सांगितल्याने शेतमालाच्या गाड्या अडवून रस्त्यावर माल टाकणारे आंदोलक आज फिरकले नाहीत. टोल नाक्यावर राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.


जुन्नर तालुक्यातील बाजारपेठांत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला जुन्नर तालुक्यात दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भागांतील आठवडेबाजार शुक्रवारी बंद ठेवले. काही ठिकाणी दुधाचा तुटवडा जाणवला, काही गावांमध्ये रतिबाचे दूध मिळाले आणि काही भागात दूध डेअरीवाल्यांनी दूधविक्री सुरू ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही़ आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करून रास्ता रोको केले.
जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे ओतूर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, बेल्हा येथील उपबाजार केंद्रे बंद ठेवण्यात आली. या बाजार केंद्रांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता़ जुन्नर शहरात दररोज पहाटे ३ वाजता भाजीपाल्याचे खरेदी-विक्री व्यवहार शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवले. काही किरकोळ भाजीपाला विक्री व्यावसायिकांनी भाजी विक्रीचा प्रयत्न केला असता तो बंद पाडण्यात आला़ ओतूर या ठिकाणी शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक राहिले़ ओतूर चौकात शेतकरी मंडप टाकून बसलेले आहेत़. दुसऱ्या दिवशीदेखील कोणताही तरकारीचा ट्रक आला नसल्याने कोठेही वादविवाद झाला नाही़ सलग सात दिवस संप सुरू ठेवण्याचा मानस या वेळी शेतकऱ्यांनी ठेवला़ ओतूर शहरात दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा जाणवला़ अनेकांना दूध उपलब्ध झाले नाही़ तसेच फळ व्यावसायिकांनीदेखील व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वसामान्यांना फळे मिळाली नाही. रोज भाजीपाला घेणाऱ्या महिलांना भाजीपाला न मिळाल्याने त्यांना पुन्हा घरी परतावे लागले़ ओतूर शहरातील कांदा विक्रीही बंद ठेवण्यात आली. आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करून रास्ता रोको केले. यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते़ शेतकऱ्यांनी एकही तरकारीचे वाहन पुढे जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली़ नारायणगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी भाजी मार्केट व उपबाजार समितीचे आवार बंद ठेवण्यात आले होते. कोणत्याही शेतकऱ्याने टोमॅटो अथवा भाजीपाला विक्रीसाठी आणला नाही़ वारुळवाडी येथील दूधसंकलन केंद्र थोड्या वेळापुरते सुरू ठेवण्यात आले़ मात्र शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांकडील दूध घ्या अन्यथा बंद ठेवा, अशी भूमिका घेतल्याने दूध विक्री बंद करण्यात आली.

शेतमाल फेकला रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी संपात उत्स्फूर्त सहभाग घेतला. नारोडी फाटा येथे शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त केला आहे. मंचर शहरात शेतकऱ्यांनी फिरून फळविक्री बंद केली. अत्यावश्यक सेवा असेलेले दूध शेतकऱ्यांनी घरीच ठेवले आहे.
कालपासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी आंबेगाव तालुक्यात शेतीमाल विक्रीसाठी पाठविण्यात आला नाही. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संपात भाग घेत आजही दूध अथवा शेतमाल बाजारात आणला नाही. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आजही बंद होती. शहरातील भाजीची किरकोळ दुकानेसुद्धा बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला व फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. फळांची विक्री सर्रास केली जात होती.
आज शेतकऱ्यांनी मंचर शहरात
फिरून फळांची विक्री बंद करावयास लावली. युवराज बाणखेले, वसंतराव बाणखेले, दत्ता थोरात, प्रवीण मोरडे, स्वप्निल बेंडे, सतीश बेंडे, अण्णा निघोट, राजेंद्र मोरडे आदींनी फिरून संपामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. दूधविक्री करणाऱ्या दुकानदारांना समज देण्यात आली. घरोघरी जाऊन दूधविक्री करणाऱ्यांना असे प्रकार करू नका, असे सांगण्यात आले. अवसरी फाटा येथील कात्रज स्टॉलवरसुद्धा कार्यकर्ते धडकले. सकाळी नारोडी फाटा येथे संतप्त शेतकऱ्यांनी शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडविली. या वेळी मोठा जमाव जमला होता. रस्त्यावर कांदा ओतून देण्यात आला. याबरोबरच रस्त्यावरून शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडविण्यात आली.

भोर तालुक्यात दूधसंकलन बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : शेतकऱ्यांच्या संपाला भोर तालुक्यातील शेतकरी व दूध उत्पादक सहकारी संस्थांनी दूध पुरवठा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे भोर शहरातील कात्रज दूध संघाच्या दूध शीतकरण केंद्रावरील सुमारे ८ हजार लिटरचा दूध पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
भोर तालुक्यातील १९६ गावांत मिळून सुमारे ६१ दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत. १० खासगी डेअरी फार्म अशा एकूण ७२ दूध संस्था आहेत. दररोज येथील कात्रज दूध संघाच्या भोर येथील डेअरीत सुमारे ८ ते ९ हजार लिटर दुधाचे संकलन करुन पुण्याला पाठवले जाते. मात्र, शेतकऱ्यांनी गावातील सहकारी दूध संस्थेला संकलन न करण्याचा व संस्थांनीही दूध न घेण्याचा निर्णय घेतल्याने काल सकाळी रामबाग येथील दूध संकलन केंद्रावर दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करुन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी सकाळी दूध संकलन पूर्णपणे बंद ठेवून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे सुमारे ८ हजार लिटर दुधाचा पुरवठा बंद ठेवला.
शेतकऱ्यांच्या संपामुळे गावागावातील दूध संकलन बंद असल्याने भोर येथील दूध संकलन केंद्र शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम होणार असल्याचे केंद्रप्रमुख रामचंद्र तांगडे यांनी सांगितले. दुधाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देता येत नाही. त्यामुळे दुधाला ५० रु. प्रतिलिटर भाव द्यावा म्हणून भोर तालुक्यातील शेतकरी व दूध सहकारी संस्थांनी शुक्रवारपासून दूध संकलन बंद करुन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याचे चिखलावडे दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ केंढाळकर व नांदगाव येथील करंजगाव येथील बापू गोळे यांनी सांगितले.


शिरूर बाजार समितीत व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : संपाचा आजच्या दुसऱ्या दिवशीही तालुक्यात चांगलाच परिणाम जाणवला. शिरूर बाजार समितीत भाजीपाला, तरकारी तसेच भुसार मालाची दररोज होणारी २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एकीकडे हे चित्र असताना हातावरचे पोट असणाऱ्या हमाल, कामगार, चहाची गाडीवाले या घटकांना आर्थिक चणचण जाणवली. नुकसान झाला तरी चालेल मात्र आपल्या शेतकरी बांधवांना पाठिंबा असल्याचे एक हमाल बांधवाने सांगितले.
कालपासून तालुक्यात अनेक भागात रस्त्यावर दूध ओतण्याचे सत्र आजही सुरू राहिले. इनामगाव येथे जवळपास दररोज ३० हजार लिटर दूधाचे संकलन होते. मात्र गेल्या दोन दिवसांत एक थेंब दुधाचेही संकलन होऊ शकले नाही. मात्र शासनाचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी आजही हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले. शिक्रापूरसह तालुक्यात अनेक गावात बंद पाळण्यात आला. शिरूर बाजार समितीत दररोज १० लाख रुपयांची केवळ भाजीपाला तरकारीची उलाढाल होते. याबरोबरच भुसार मालाची १५ ते २० लाख रुपयांची उलाढाल होते. दोन दिवस बाजार पूर्ण बंद ठेवल्याने दोन दिवसांत जवळपास २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांनी आज पत्रक काढून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. बंदचा परिणाम (दोन दिवसांच्या) व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना फारसा फरक पडणार नाही. मात्र बाजार समितीत होणाऱ्या उलाढालीवर अवलंबून असणारे हमाल, कामगार यांना लगेच झळ बसली. संप लांबल्यास या घटकावर त्याचा मोठा परिणाम जाणवेल. मात्र या घटकाला त्याची फिकीर नाही. आम्हाला झळ सोसावी लागली तरी चालेल मात्र शेतकऱ्यांना आमचा पाठिंबाच राहील, असे एका हमालाने सांगितले. उद्या शिरूरचा आठवडे बाजार बंद आहे. शिरूरसह श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील शेतकरी आपला माल घेऊन येथे विक्रीस येतात. बंदमुळे उलाढालीवर परिणाम जाणवेल.


राजगुरूनगरला आठवडेबाजार भरलाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : खेड तालुक्यात आज दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध विक्रीसाठी नेले नाही, तसेच काही गावात दूध घरोघरी कुटुंबांना वाटण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी विक्री भाजीपाला बाजारात आणला नाही. त्यामुळे आज शुक्रवारचा आठवडेबाजार असूनही बाजार भरला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. तसेच राजगुरुनगर नगर परिषदेलगत भरणारा दररोजचा भाजी आज बाजार भरला नाही. जुना मोटारस्टँड येथील दररोज भरणारा भाजीपाला शेतकऱ्यांनी आक्रमक होत उठवून लावला. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या शेतमालाच्या पाट्या भिरकावून देऊन भाजीपाला जमिनीवर ओतून दिला.

संपामुळे चाकण बाजारात शुकशुकाट
आसखेड : शेतकऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी चाकण बाजारात कुठल्याच मालाची आवक झाली नाही. रोज भरणारा फळभाजी व पालेभाज्यांच्या ठोक बाजारात शेतकऱ्यांसह व्यापारी न आल्याने शुकशुकाट जाणवत होता. शेतमालाची खरेदी-विक्री न झाल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला. फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली.
चाकण परिसरात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन पालेभाज्या, फळभाज्या व दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. मात्र राज्याच्या अनेक भागांत दुधाचे टँकर अडविले असल्याचे वृत्त समजल्यामुळे दूध संकलन केंद्रावर दूध देण्याचे शेतकऱ्यांनी टाळले. त्यामुळे दूध संकलनाच्या आकडेवारीवर
परिणाम झाला.

पुरंदरला दूधसंकलन घटले
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : पुरंदर तालुक्यात शेतकरी संपाला प्रतिसाद वाढू लागला असून, उद्या शनिवारी सासवड येथील व्यापारी एक दिवस व्यवहार बंद ठेवून संपाला पाठिंबा देणार आहेत. जेजुरीतील छत्रपती संभाजीराजे संकुलातील दररोजच्या भरणाऱ्या भाजी मंडईत शुक्रवारी शुकशुकाट होता. संपूर्ण तालुक्यातील दूध संकलनावरही मोठा परिणाम जाणवला. उद्यापासून दूध संकलन बंद करण्याचा निर्णय अनेक दूध संकलन केंद्र चालकांनी घेतला असून, शेतकरी संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संपाचा जेजुरी, सासवड, नीरा यांसारख्या शहरातील जनजीवनावर परिणाम जाणवू लागला आहे.
सासवड येथील दररोज पहाटे भरणाऱ्या भाजीपाला बाजारावरही आज परिणाम जाणवला. मार्केटमध्ये आज तुरळक शेतकरी आले होते. भाजीपाला खरेदीसाठी व्यापाऱ्यांची संख्या ही अत्यंत नगण्य होती. अनेक शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. शेतकरी संघटनाकडून संपात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उद्या भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हा संप बेमुदत असेल असेही शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. जेजुरीतील छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुलात दररोज भाजीपाला बाजार भरतो. परिसरातील शेतकरी व व्यापारी या बाजारात भाजीपाल्याची विक्री करीत असतात. संपामुळे आज आठवडे बाजार भरलाच नाही. यामुळे आजचा दररोजचा भाजीबाजार भरलाच नाही. याचा मोठा परिणाम जाणवला. नीरा येथेही अशीच परिस्थिती आहे. तालुक्यातील भाजीपाला, तरकारीवर जेवढा परिणाम झाला आहे, त्याहीपेक्षा जास्त परिणाम दूध संकलनावर झाला आहे.
फोटो मेल केला आहे


शेतकरी संपात सर्वांचा सहभाग
सासवड : शेतकऱ्यांचे संपामध्ये दूध संकलन केंद्र, किरकोळ भाजी विक्रेते, व्यापारी यांचा पूर्ण पाठिंबा असून शनिवार पासून सर्वजण संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुरंदर तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी दिली. या संपाचे निवेदन तहसीलदार पुरंदर याना दिले आहे. शेतीकाऱ्यांच्या मागण्या मेनी होई पर्यंत शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणणार नाहीत संप शांततापूर्ण वातावरणात होईल असेही गिरमे यांनी सांगितले.

खळदला काही काळ तणाव
खळद : तालुक्यातील येमाई शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरातील शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला. येथील सर्व दूध संकलन केंद्रे बंद होती. या वेळी शेतकऱ्यांनी आमचे दूध, आमचा भाजीपाला आमच्याच गावात अशी भूमिका घेत दूध गावातून बाहेर जाऊ दिले नाही. शुक्रवारी सकाळी निळुंज येथील सोनाई परिवाराचे, वाळुंज येथील सह्याद्री अ‍ॅग्रोचे दूध संकलन केंद्र बंद ठेवले होते. शिवरी येथील आनंदी दुधाचे संकलनही बंद होते. पण काही उत्साही शेतकरी आपले दूध घेऊन आले होते. या वेळी येथे काही काळ तणाव निर्माण झाला. पण अखेर शेतकरी पुन्हा दूध घरी घेऊन गेले. उद्यापासून आम्ही दूध आणणार नसल्याचे जाहीर केल्याने हा तणाव निवळला.

अकोलेत रस्त्यावर दूध ओतले

अकोले : राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी अकोले येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून संपाला पाठींबा दर्शविला. समस्त गावकऱ्यांनी सकाळी संपात सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक एकत्र येऊन पाटील वस्तीवरील दूध संकलन केंद्रावर पाचशे लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले आणि संपात सहभागी असल्याचे दाखवून दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निर्ढावलेल्या सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या बाबतीत कडवट प्रतिक्रिया दिल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ आणि दूध उत्पादक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आठवडेबाजार बंद.....
अकोले येथे दर शनिवारी भरवण्यात येणार फळे,भाजीपाला अशा अनेक वस्तूंचा बाजार शेतकरी संपाला पाठींबा दर्शवण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबत राज्यातील सर्वच शेतकरी सहभागी झाल्याने गावातील लोकांनी सहभागी होण्यासाठी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने परिसारतील लोकांना काळवण्यात आले आहे यामुळे पोंधवडी, पवारवाडी, वायसेवाडी, धायगुडेवाडी, नरुटेमळा,गैरसोय टाळण्यासाठी आगोदरच आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वच शेतकरी संपावर गेल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झाले आहे.

दूधाचा अभिषेक महादेवाला करण्याचा निर्णय...
संपाला पाठिंबा देण्यासाठी अकोले ग्रामस्थांनी उद्या पासून दूध ओतून देण्यापेक्षा त्या दूधाचा अभिषेक महादेवाला अभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे सरकारला देवाने सद्बुद्धी द्यावी आणि कर्जमाफी करावी अशी मनोकामना दूधाचा अभिषेक करून करण्यात येणार आहे.अशा पद्धतीने संपात सहभागी होण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.


पारवडीत कडकडीत बंद
पारवडी : येथील राज्यव्यापी शेतकरी संपाला पारवडी परिसरातील शेतकऱ्यासह दुकानदार दूध व्यावसायिक तसेच तरूण वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संपूर्ण गाव बंद करून पाठिंबा दिला. यावेळी दूध व्यवसाय शेतकऱ्यांनी गावातील मुख्य चौौकात शेतकरी संपात सहभागी होत दूध रस्त्यावर ओतून तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत पारवडीचे उपसरपंच कुंडलिक गावडे यांनी लोकमतला माहिती देताना गेल्या तीन वषार्पासून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही दूधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत जाऊन कर्ज बाजारी झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी शेतकरी संपाला गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्सुफळ येथे दूधसंकलन बंद
शिर्सुफळ : येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरुद्ध एल्गार केला. आठवडे बाजार व गावातील दूध कुलर बंद ठेवून संपला पाठींबा दिला. शिर्सुफळ येथे संपाची ठिणगी पडली. शुक्रवार गावचा आठवडे बाजार असल्याने सकाळी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाजार बंदची हाक देण्यात आली. परंतु शेतकरी संपावर असल्याने ग्रामस्थांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिर्सुफळ बाजार तळाच्या परिसरात शुकशुकाट होता. शिर्सुफळ आठवडे बाजारात शिर्सुफळसह साबळेवाडी, गाडीखेल, पारवडी, उंडवडी अशा परिसरातील अनेक गावातून लोक येत असतात. त्यामुळे नागरिक शेतकरी संपामुळे बाजारापासून वंचित राहिले.

वाणेवाडीचा बाजार बंद
सोमेश्वरनगर : वाणेवाडी येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आठवडे बाजार बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. आज सकाळी काही व्यापारी बाजारात आले होते. ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक होवून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला. दर शुक्रवारी वाणेवाडी या ठिकाणी आठवडे बाजार भरत असतो. मुरुम, करंजेपुल, करंजे, होळ, निंबुत, वाघळवाडी, साखरवाडी, वडगाव आदी भागातले शेतकरी या ठिकाणी आपला भाजीपाला विकण्यासाठी येत असतात. शेतकरी संपाला आता ग्रामीण भागातूनही
मोठा पाठिंबा मिळत असून शेतकरी संपात सहभागी होत आहेत.

निमगाव केतकीचा आठवडे बाजार बंद
निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील आठवडे बाजार हा शनिवारी मोठ्या स्वरूपात भरत असतो. या आठवडे बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र राज्यव्यपी पुकारल्या गेलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी निमगाव केतकी येथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली. सर्व शेतकरी बांधवांना आपला शेतमाल विक्री साठी आणू नये, असे शेतकरी संघटना आणि निमगाव केतकी ग्रामस्थ यांच्या वतीने आवाहन देखील करण्यात आले आहे आठवडे बाजार बंदचे निवेदन ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे.

पाटस स्थानकात शेतकऱ्यांनी
दूध ओतले

पाटस : पाटस येथील रेल्वे स्थानकात कानगाव येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दूध रेल्वे स्टेशन परिसरात ओतून दिले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे अशा घोषणा आंदोलकांनी रेल्वे स्थानकात दिल्याने परिसर दणाणून गेला होता. दुपारी पुण्याकडे जाणारी डेमू लोकल आली. या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी डेमू पाटस स्थानकात आल्यानंतर इंजिनसमोर मोठ्या प्रमाणावर दूध ओतून दिले. या वेळी माऊली शेळके, भानुदास शिंदे, सयाजी मोरे, संतोष शेलार, संतोष गायकवाड, गेनबा कवले, सदाशिव नलवडे यांसह आंदोलक सहभागी झाले होते.

शिरापूरला शेतकरी संपाला प्रतिसाद
देऊळगावराजे : शिरापूर (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत दूध संकलन केंद्रावर दूध आणून ओतून देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन योजना करावी, शेतीसाठी अंखड वीजपुरवठा करण्यात यावा, मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी संपावर गेले असून दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी या संपाला प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांनी सकाळी दूध आणल्यावर दूध संकलन केंद्रावर ओतून दिले. त्यानंतर सरकारचा निषेध करण्यात आला.


३0 हजारांपैैकी एकही लिटर दूध संकलन नाही
निमोणे : परिसरातून दोन दिवसांत भाजीपाला व कांदा विक्रीसाठी बाहेर गेला नाही. याशिवाय दररोज ३० हजार लिटर दुधाचे संकलन होते. मात्र संकलकच या संपात सक्रिय आहेत. त्यांनीही संकलन केंद्रे बंद ठेवून शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. निमोणे येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून व कांदे फेकून देऊन आंदोलन केले. या वेळी त्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा शेलक्या भाषेत समाचार घेतला. शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, शिरूर तालुका शेतकरी सेनेचे प्रमुख योगेश ओव्हाळ, जालिंदर काळे यांनीही या वेळी शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे अशी मागणी केली. या आंदोलनाप्रसंगी जिजाताई दुर्गे, भरत काळे, नानासो काळे, पांडुरंग दुर्गे, जालिंदर काळे, श्रीधर साळुंके, दिलीप जाधव, अंकुश जाधव, विलास होळकर, संजय काळे, दत्ता जाधव, आनंदा ढोरजकर, पुरुषोत्तम जगदाळे, रवींद्र थोरात, नवनाथ काळे, गोकुळ काळे, प्रकाश काळे, संतोष काळे, रामकृष्ण गायकवाड, कृष्णा माने, बाळासो काळे, प्रल्हाद काळे उपस्थित होते.



जुन्नर, ओतूरचे लिलाव बंद


कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या संपाला जुन्नर परिसरातील शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी भाजीपाला व दुधाची विक्री बंद केली. मुंबईत जाणाऱ्या गाड्या आंदोलकांनी रोखून धरल्या. राज्यातील कांदा खरेदीचे सर्वांत मोठे केंद्र असणाऱ्या जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर येथील मुख्य बाजार समितीत संपामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपामुळे कांद्याची आवक होऊ शकली नाही. जुन्नरमध्ये बाजार समितीच्या आवारात दररोज पहाटे होणारी भाजीपाला विक्री बंद राहिली.
जुन्नर शहरात परदेशपुरा येथे भरणारा दैनंदिन भाजीबाजार बंद राहिला. भाजीबाजारात तसेच बाजार समितीच्या आवारात सर्वत्र शुकशुकाट होता. शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, सेनेचे पदाधिकारी तसेच युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन संपाला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करत होते.

Web Title: Markets jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.