गुण ८०; प्रश्नपत्रिका चक्क १०० गुणांची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:21 PM2019-05-13T19:21:31+5:302019-05-13T19:21:58+5:30
विद्यापीठाचा अजब कारभार : विधी अभ्यासक्रमाच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पेपरला विद्यार्थी गोंधळले
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेत पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाचा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पेपर ८० गुणांचा की १०० गुणांचा, असा गोंधळ उडाला होता. हा पेपर ८० गुणांचा असताना, १०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. या पेपरला नैसर्गिक न्यायानुसार विद्यार्थ्यांना गुण प्रदान करावे, अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे.
अकोला येथील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची भेट घेऊन २९ एप्रिल रोजीच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पेपरची हकिकत त्यांच्या पुढ्यात विशद केली. एलएलबी पाच वर्षीय डीसी अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्राच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात २९ एप्रिल रोजी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान घेण्यात आली. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा पेपर नवीन अभ्यासक्रमानुसार ८० गुणांचा असताना, १०० गुणांच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्यात. केंद्र पर्यवेक्षक व परीक्षा कर्मचाऱ्यांना चूक लक्षात आणून दिल्यानंतरही ही बाब दुर्लक्षित करण्यात आली. गोंधळून गेल्याने परीक्षार्थी चांगल्या तऱ्हेने प्रश्न सोडवू शकले नाहीत.
प्रश्नपत्रिका या विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या असून, परीक्षा केंद्रावर केवळ एकच संच असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये अकोला येथील नथमल गोयनका विधी महाविद्यालय आणि अकोला विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अन्यथा विद्यापीठ परीक्षा नियमानुसार गुणफरकाची योग्य दखल घेत अनुपातात मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उज्ज्वल उमाळे, ए.एम. शेख, आर.एम. मोलके, बी. एस. किटे, सागर नवनाथे, वैभव वानरे, अर्पिता साबद्रा, गोपाल नागोलकर, एम.बी. वानखडे आदी उपस्थित होते.
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ पेपरबाबत विद्यापीठ प्रशासनाची चूक आहेच. मात्र, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. १४ मे रोजी मूल्यांकन मंडळाची बैठक होणार असून, यात निर्णय घेतला जाईल.
- राजेश जयपूरकर
प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ