बलात्काराची केस मागे घेण्यासाठी विवाहितेवर पुन्हा अत्याचार
By Admin | Published: April 26, 2017 10:06 PM2017-04-26T22:06:20+5:302017-04-26T22:06:20+5:30
वर्षभरापूर्वी नोंदविलेली बलात्काराची तक्रार मागे घ्यावी, यासाठी विवाहितेला पळवून नेऊन
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - वर्षभरापूर्वी नोंदविलेली बलात्काराची तक्रार मागे घ्यावी, यासाठी विवाहितेला पळवून नेऊन दोन महिने घरात डांबून ठेवलेल्या पीडितेची पोलिसांनी सुटका केली. या दोन महिन्यांच्या कालावधीत आरोपीने सतत अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे नोंदविली. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेपटरी परिसरातील संतोषीमातानगर येथे बुधवारी दुपारी घडली.
प्रकाश नरवडे (३०,रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलीस आणि पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, आरोपीने वर्षभरापूर्वी पीडितेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १६ एप्रिल २०१६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. हा खटला सुनावणीसाठी आल्याने आरोपीच्या पायाखालची वाळू घसरली. ही केस मागे घ्यावी, यासाठी तो साम, दाम, दंड, भेदाचा वापर करीत आहेत. पीडितेच्या मानलेल्या भावाच्या मदतीने २६ फेब्रुवारी रोजी त्याने तिला गाठले. बलात्काराची केस मागे घेण्याची धमकी त्याने दिली. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने बळजबरीने रिक्षात कोंबून तिला त्याच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिला घरात डांबून ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत तो तिचे दोन मुले, पती आणि अन्य नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करीत होता. आरोपीनेच पीडितेला डांबून ठेवल्याचे तिच्या नातेवाईकांना कळल्याने ते तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात गेले असता पोलिसांनी ठाण्याच्या प्रवेशद्वारातूनच त्यांना हाकलून दिल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला. त्यानंतर पोलीस आयुक्त आणि लोकशाही दिनातही त्यांनी तक्रार अर्ज दिले होते.
एसीपी बाखरेंच्या आदेशाने पोलिसांनी मारली धाड
एका विवाहितेला घरात डांबून ठेवून दोन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते भानुदास कीर्तिशाही, सर्जेराव मगरे, सुंदर साळवे यांनी सहायक पोलीस आयुक्त माणिक बाखरे यांना कळविले. बाखरे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या घरावर छापा मारून पीडितेची सुटका केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.
बलात्कार, डांबून ठेवण्याचा नोंदविला गुन्हा
पीडितेने बुधवारी दुपारी आरोपी प्रकाशविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पो. नि. मुदिराज यांनी दिली.