न्यायाधीशांसमोर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 01:27 PM2017-01-31T13:27:28+5:302017-01-31T14:16:08+5:30

पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या महिलेने चक्क न्यायाधीशासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सांगलीतील हा धक्कादायक प्रकार आहे.

Marriage attempt suicide before judges | न्यायाधीशांसमोर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

न्यायाधीशांसमोर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 31 - पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या मंगरुळ-चिंचणी येथील स्वाती महेश शिंदे या विवाहितेने चक्क न्यायाधीशासमोर स्वत:च्या गळ्याला चाकू लाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायाधीश, कर्मचारी व पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला. सांगलीच्या पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. 
 
स्वाती शिंदे हिने पर्समधील चाकू काढून गळ्याला लावला. न्यायाधीशांना आत्महत्येची धमकी देऊन ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्याय प्रक्रियेवर माझा विश्वास नाही’, असा आरोपही केला. न्यायालयाने तिला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न, न्यायालयाच्या कामात व्यत्यय व न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
दरम्यान, स्वाती शिंदेला रात्रीच अटक करुन काही तासानंतर तिला जामीनावर सोडूनही देण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  स्वाती हिचा डिसेंबर २०१४ मध्ये मंगरुळमधील महेश शिंदे यांच्याशी विवाह झाला आहे. तिचे पती महेश ऑस्ट्रेलिया येथे खासगी कंपनीत नोकरी करतात. विवाहानंतर दीड-दोन महिने स्वाती सासरी होती. त्यानंतर कौटुंबिक कारणावरुन मतभेद निर्माण झाल्याने ती मोहरी निघून गेली. नातेवाईकांनी मध्यस्थी करुन मतभेट मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वातीने सासरी जाण्यास नकार दिला. ऑगस्ट २०१६ मध्ये तिने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सांगलीतील पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 
 
या अर्जावर दोन-तीन वेळा सुनावणी झाली. न्यायालयाने महेश व स्वाती या दाम्पत्यास तडजोड करण्यास वेळ दिला होता तरीही त्यांच्यातील भांडण मिटले नाही. स्वातीने न्यायालयास माहेरी जाण्यास स्पष्टपणे नकार देऊन घटस्फोटाचा निर्णय देण्याची मागणी केली होती. या दरम्यान 30 जानेवारी रोजी घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम सुनावणी होती. त्यामुळे स्वाती व महेश यांचे नातेवाईक सकाळपासून न्यायालयाच्या आवारात बसून होते. दुपारी प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज निकाल काढला. त्यामुळे महेश व स्वातीचे नातेवाईक न्यायालयातून बाहेर पडले. महेशचे नातेवाईक मंगरुळला (चिंचणी) जाण्यासाठी तेथून निघालेही होते. त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता स्वाती अचानक पुन्हा न्यायालयात गेली. न्यायालयात दुस-या खटल्याचे कामकाज सुरु होते.
 
स्वातीने न्यायालयास ‘मी पतीसोबत नांदायला तयार आहे’, असे सांगितले. यावर न्यायालयाने शिपायास तिच्या पतीला बोलावून आणण्यास सांगितले. पण पती व त्याचे घरचे निघून गेले होते. त्यामुळे स्वातीने अचानक पर्समधील चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला. ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास नाही’, असा आरोप करुन आत्महत्येची धमकी दिली. या प्रकारामुळे न्यायालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 
 
पोलीस, कर्मचा-यांची धावपळ
स्वातीने पर्समधील चाकू काढून चक्क न्यायाधीशासमोर स्वत:च्या गळ्याला लाऊन आत्महत्येची धमकी दिल्याने न्यायालयातील कर्मचारी, शिपाई व  पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तिला बोलण्यात गुंतवून महिला पोलिस कर्मचा-यांनी तिच्याकडील चाकू काढून घेतला. तिला ताब्यात घेण्यात आले. तिला थेट शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. पोलिसांना तिला जामीनावर सोडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच तिला जामीनावर सोडले. 
 

Web Title: Marriage attempt suicide before judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.