डोळ्यांचे पारणे फेडणारा '' एक '' हृदयदायक सोहळा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 08:50 PM2019-05-11T20:50:40+5:302019-05-11T20:53:22+5:30
यापूर्वी तुम्ही कधी असं लग्न पाहिलं नसेल...
पुणे : पुष्पमालांनी सजलेला मंडप आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट... सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर... वाटी चमचा पासून ते फ्रिजपर्यंत मोठया हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत... आणि आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवित अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन व दिव्यांग बांधव, असे चित्र पुण्यात पाहायला मिळाले. नशिबाने आयुष्यात अंध:कार भरला असला तरी जिद्दीने आयुष्यात ते यशस्वी झाले आणि आज एकमेकांची साथ मिळाल्यानंतर आयुष्यातील स्वप्न एकत्र बघण्यास ख-या अथार्ने सुरुवात केली. डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने केलेली विचारपूस पाहून त्यांच्या डोळ्याच्या कडाही आनंदाश्रूंनी पाणावल्या.
निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, सहकारी संस्था व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे आर्थिकदृष्टया दुर्बळ असलेल्या दृष्टीहिन व दिव्यांग मुला-मुलींच्या अनोख्या विवाह सोहळयाचे. यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, साहित्य, गणेशोत्सव मंडळांंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
बीड येथील महेश सातपुते या दृष्टीहिन तरुणाचा विवाह जालना येथील सिंधू शिंदे या दृष्टीहिन तरुणीशी झाला. महेश सातपुते हे १२ वी पास असून महेश आणि सिंधू हे दोघेही एकत्र काम करतात. दुसरे दाम्पंत्य हे विशाल झनकर आणि सुनंदा काळे हे दोघे ही दिव्यांग असून विशाल झनकर हा नाशिकचा असून सध्या तो खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. तर सुनंदा काळे ही मूळची बीडची असून ती देखील एका खासगी कंपनीमध्ये काम करते.
सुनंदा काळे (दिव्यांग वधू) म्हणाली, पुण्यात येऊन माझे गणेश मंडळातील सदस्यांसोबत मामा भाचीचे नाते जोडले गेले. त्यांनी माज्या लग्नाची खूप मोठी तयारी केली. आयुष्यात मला अशी माणसे भेटतील असे कधीच वाटले नव्हते. या देवसारख्या माणसांनी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे माझा लग्न सोहळा घडवून आणला आहे, त्या बदल मी त्यांची सदैव ऋणी राहीन.
सिंधू शिंदे ( दिव्यांग वधू) म्हणाली, माझ्या घरच्यांनी जेवढे केले नसते तेवढे या सगळ्या मामांनी केले आहे. पुण्यातील बाजारपेठेत माझ्या लग्नाचे कपडे व वस्तू खरेदी पासून मेहंदी सोहळ्यापर्यंत प्रत्येक क्षण मी ख-या अर्थाने जगले. असा सोहळा माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीही झाला नाही त्यामुळे मला आज खूप आनंद झाला आहे.
सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांसह पुणेकरांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेसोबत या विवाहसोहळ्याची तयारी सुरु केली. गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. दरबार बँड, पुणे वरातीमध्ये सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था आणि पुणेकरांनी दिलेल्या मदतीतून हा विवाहसोहळा मोठया उत्साहात पार पडला.