विवाहितेने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 10:41 PM2016-08-21T22:41:38+5:302016-08-21T22:41:38+5:30

एक विवाहित महिला दादर पोलिसांकडे जाते. तिघा जणांनी अपहरण केल्याची तक्रार देते. हा गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे येतो.

Marriage has created itself as a kidnapping | विवाहितेने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

विवाहितेने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - एक विवाहित महिला दादर पोलिसांकडे जाते. तिघा जणांनी अपहरण केल्याची तक्रार देते. हा गुन्हा तपासासाठी पुणे पोलिसांकडे येतो. वानवडी पोलीस गांभिर्याने तपास करतात. महिलेच्या बोलण्यावर पोलिसांना संशय येतो. कसून केलेल्या तपासाअंती निष्पन्न होतो बनाव. घरामध्ये करमत नसल्यामुळे स्वत:च मुंबईची वाट धरलेल्या महिलेचा खोटारडेपणा अखेर उघड होतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मुळची मुंबईची आहे. तिचे बालपण व शिक्षण सर्व मुंबईत झालेले आहे. तिचे चार महिन्यांपूर्वी महंमदवाडी परिसरातील एका तरुणाशी लग्न झाले. तिचा पती चालक आहे. लग्नानंतर ही महिला पुण्यातील वानवडी परिसरात राहण्यास आली. परंतु तिचे मन पुण्यामध्ये रमत नव्हते. सतत मुंबईला जायची इच्छा तिला होत होती. एक दिवस तिने सासुच्या पर्समधून गुपचुप पैसे घेतले. एक दिवस ती सासरच्यांना न सांगताच पुणे स्टेशनवरुन रेल्वेने मुंबईला निघून गेली. त्यानंतर मात्र, पती आणि वडिलांना काय सांगावे असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे तिने अपहरणाची कथा रचली. भाजी खरेदी करण्यासाठी गेलेली असताना मोटारीमधून आलेल्या तिघाजणांनी गुंगीचे औषध देऊन आपले अपहरण केल्याचे सांगतानाच जेव्हा आपल्याला शुद्ध आली तेव्हा दादर येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोटारीतील तिघांना हिसका देऊन सुटका करुन घेत पोलिसांकडे मदत मागितल्याचे तिने सांगितले होते. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत दादर पोलिसांनी विनयभंगासह अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
ही घटना वानवडीमध्ये घडलेली असल्यामुळे पुणे पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. या महिलेकडे चौकशी करताना अपहरण झालेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांनी मिळवली. तिने सांगितलेल्या अपहरणाच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यामध्ये अशी कोणतीही घटना घडल्याचे दिसत नव्हते. तिच्याकडे सखोल चौकशी करुन सत्य वदवून घेण्यात पोलीस यशस्वी झाले. शेवटी पोलिसांच्या प्रश्नांच्या मा-यासमोर टिकाव धरु न शकलेल्या या महिलेने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. तिच्यावर याप्रकरणी कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली.

Web Title: Marriage has created itself as a kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.